राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी कप स्पर्धेचा उत्साहात समारोप…

कोपरगाव प्रतिनिधी
कोळपेवाडी वार्ताहर:-क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य हॉकी क्रीडांगणावर दि.२७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी कप क्रीडा स्पर्धा २०२६-२७ चा बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दिनार कुदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बक्षीस वितरण समारंभात १५ वर्षांखालील मुले, १७ वर्षांखालील मुले तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटातील विजेत्या, उपविजेत्या आणि तृतीय क्रमांक प्राप्त संघांना चषक प्रदान करून गौरविण्यात आले.या तीन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील विविध विभागांतील उत्कृष्ट हॉकी संघांनी सहभाग नोंदविला.१५ वर्षांखालील गटात आठ विभाग, तर १७ वर्षांखालील गटात नऊ विभाग सहभागी झाले होते. त्यामुळे गौतम पब्लिक स्कूलचे हॉकी मैदान तीन दिवस हॉकीच्या रोमांचक सामन्यांनी गजबजून गेले होते.
१७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात फलटण-कोल्हापूर विभागाच्या संघाने ३-० असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. तर प्रवरा कन्या विद्यालय, लोणी, पुणे विभाग हा संघ उपविजेता ठरला. मुंबई विभागाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला.१७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात क्रीडा प्रबोधिनी, संभाजीनगर या संघाने पेनल्टी स्ट्रोकमध्ये विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. जी. एन. खालसा कॉलेज, मुंबई हा संघ उपविजेता ठरला, तर डी.सी.नरके विद्यालय, कोल्हापूर विभाग या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.१५ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात डॉन बॉस्को हायस्कूल, मुंबई संघाने पेनल्टी स्ट्रोकमध्ये २-० असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर, पुणे विभाग हा संघ उपविजेता ठरला. तर खालसा हायस्कूल नांदेड लातूर विभाग या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.यावेळी विविध संघांचे क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू आणि आयोजक यांचा सन्मान करण्यात आला. तीन दिवसांच्या स्पर्धेत उत्कृष्ट क्रीडाशिस्त, संघभावना आणि कौशल्याचे दर्शन घडविणाऱ्या खेळाडूंचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
या समारंभास क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, भगवान पवार, प्रवीण कोंडावळे, कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे निरीक्षक नारायणराव बारे, गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख, गौतम पॉलिटेक्निकचे प्राचार्य वसीम शेख, सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. गुरसळ मॅडम, संघांचे प्रशिक्षक, स्पर्धेचे आयोजक,पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी सर्व विजेत्या व सहभागी खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक, पंच, आयोजक आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी कप स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कोपरगाव तालुका क्रीडा समिती उपाध्यक्ष व गौतमचेक्रीडा विभाग प्रमुख रमेश पटारे, राजेंद्र आढाव, इसाक सय्यद, महेश गोंडे, दानिश शेख, अविनाश कोळपे, कु.सार्थक पटारे, कु. गौरी बारवकर, हाऊस मास्टर प्रकाश भुजबळ, नसिर पठाण, आबासाहेब जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच शाळेचे दोन्ही विभागांचे पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत मोलाचे सहकार्य केले.गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य आणि प्रशस्त हॉकी मैदानावर सलग तीन दिवस झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे गौतमनगरच्या क्रीडांगणावर राज्यभरातील हॉकीपटूंचा जल्लोष पाहायला मिळाला. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि दर्जेदार क्रीडा सुविधांमुळे स्पर्धेचा समारोपही उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. रेखा जाधव यांनी केले
