जीवनात ध्येय गाठण्यासाठी आत्मविश्वासासोबत कठोर परिश्रमही गरजेचे :- सौ. चैतालीताई काळे…

राधाबाई काळे कन्या विद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ…
कोपरगाव प्रतिनिधी
कोळपेवाडी वार्ताहर- तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे याची जाणीव तुम्हाला होणे गरजेचे आहे. त्यामुळे कधीही नकारात्मक विचार करू नका जीवनात यशस्वी व्हायचे असेल आणि इच्छित ध्येय गाठायचे असेल तर आत्मविश्वास अत्यंत गरजेचा आहे असा मौलिक सल्ला जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी विद्यार्थिनींना दिला.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी अंतर्गत मैदानी व लेखी परीक्षा केंद्राचे उद्घाटन सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील मुलींमध्ये प्रचंड क्षमता आणि जिद्द असते. त्यामुळे कोणत्याही संकटाला न घाबरता, कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर आपली स्वप्ने पूर्ण करावीत. शासकीय व पोलीस सेवेत भरती होऊन देशाची सेवा करणे हे अत्यंत अभिमानास्पद कार्य असून मुलींनी या संधीचे सोने करावे.
रयत शिक्षण संस्थेने नेहमीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या शिक्षणाला आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे. पोलीस दलात महिलांसाठी मोठ्या प्रमाणात संधी असून योग्य मार्गदर्शनाअभावी ग्रामीण भागातील मुली मागे राहू नयेत यासाठी सुरू करण्यात आलेली ही अकॅडमी विद्यार्थिनींच्या स्वप्नांना नवी दिशा देणारी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.आई-वडील आपल्या भविष्यासाठी मोठे कष्ट घेतात, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. आपल्या परिस्थितीची इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. सोशल मीडियाचा वापर केवळ फोटो आणि दिखाव्यासाठी न करता ज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअरसाठी करा. शिस्त, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर शाळेचे, शिक्षकांचे, समाजाचे आणि आपल्या पालकांचे नाव उज्ज्वल करा असे आवाहन सौ.चैतालीताई काळे यांनी केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या १९९८ च्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने व डॉ.दत्तात्रय कोळपे यांच्या प्रयत्नातून अकॅडमीमधील विद्यार्थिनींना ड्रेसचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून सौ.मनीषा पानगव्हाणे उपस्थित होत्या. यावेळी स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष कचरु कोळपे, सदस्य अशोकराव भगत, दिनकर वाकचौरे,बाळासाहेब ढोमसे,अविनाश काळे, प्राचार्या निता केदार, पर्यवेक्षक किरण चांदगुडे, भाऊसाहेब आरोटे,अकॅडमी प्रमुख विक्रम कुलकर्णी, प्रशिक्षक सौ.सुरेखा मेहेरखांब,समन्वयक सौ.रोहिणी आभाळे, शिक्षक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
