गौतम पब्लिक स्कूलचा हॉकीत ‘दबदबा’कायम, विभागीय स्पर्धेत अहिल्यानगरचे करणार नेतृत्व…
कोपरगाव प्रतिनिधी
कोळपेवाडी वार्ताहर :- हॉकीच्या मैदानावर आपल्या विजयाची परंपरा कायम राखत गौतम पब्लिक स्कूलच्या सब-ज्युनिअर हॉकी संघाने जिल्हास्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करीत विजेतेपद पटकावले आहे. या शानदार विजयाच्या जोरावर गौतम पब्लिक स्कूलचा संघ आता जवाहरलाल नेहरू हॉकीच्या विभागीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.
प्रवरा पब्लिक स्कूल, लोणी येथे प्रवरा पब्लिक स्कूल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी आपल्या खेळातील कौशल्य, वेग, अचूक पासिंग, भक्कम बचाव आणि आक्रमक खेळाचे उत्कृष्ट दर्शन घडवत आपला हॉकी खेळातील दबदबा कायम ठेवत प्रतिस्पर्धी संघांवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. उपांत्य फेरीच्या सामन्यात गौतम पब्लिक स्कूल विरुद्ध प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल अशी लढत झाली. सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवलेल्या गौतमच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करण्याची संधी न देता ७–० अशा मोठ्या फरकाने विजय मिळविला. या दमदार विजयासह गौतमच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात गौतम पब्लिक स्कूल विरुद्ध यश अकॅडमी, सोनई यांच्यात सामना रंगला. अंतिम सामन्याचा दबाव न घेता गौतमच्या खेळाडूंनी संयमी, नियोजनबद्ध आणि प्रभावी खेळ करत २–० असा विजय मिळविला. या विजयासह गौतम पब्लिक स्कूलने जिल्हास्तरीय विजेतेपदावर आपले नाव कोरले आणि विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी आपली दावेदारी भक्कम केली.गौतम पब्लिक स्कूलचा हॉकी क्षेत्रातील लौकिक संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. शाळेच्या हॉकी संघाने यापूर्वीही अनेक वेळा दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे यंदाच्या जिल्हास्तरीय विजयानंतर विभागीय स्पर्धेतही गौतमच्या संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
गौतम पब्लिक स्कूलमध्ये १५ व १६ सप्टेंबर २०२६ रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जवाहरलाल नेहरू सब-ज्युनिअर व ज्युनिअर मुले तसेच मुली यांच्या विभागीय हॉकी स्पर्धा देखील गौतम पब्लिक स्कूलमध्येच होणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली. गौतम पब्लिक स्कूलच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, संस्थेचे ट्रस्टी आमदार आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे तसेच संस्थेच्या संचालक मंडळ, संस्था इन्स्पेक्टर नारायणराव बारे यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.प्राचार्य नूर शेख, हॉकी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा विभाग प्रमुख रमेश पटारे, राजेंद्र आढाव, इसाक सय्यद, महेश गोंडे, सर्व क्रीडा शिक्षक, दोन्ही विभागांचे पर्यवेक्षक, हाऊस मास्टर्स, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.“जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी ही अभिमानाची बाब असून, विभागीय स्तरावरही संघाने उत्तम कामगिरी करत गौतम पब्लिक स्कूलसह अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उंचवावे,” अशी अपेक्षा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

फोटो ओळ-जिल्हास्तरीय सब ज्युनिअर नेहरू हॉकी स्पर्धेमध्ये विजयी गौतम पब्लिक स्कूलच्या संघात समवेत प्राचार्य नूर शेख, सौ.रईसा शेख, बाळासाहेब अंबाडे प्राचार्य प्रवरा पब्लिक स्कूल, हॉकी कोच रमेश पटारे, इसाक सय्यद व खेळाडू.
भविष्यातील सक्षम क्रीडापटू घडविण्याची आमची बांधिलकी—————-
चौकट :- गौतम पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धांचे सातत्याने आयोजन करून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावर्षीही तालुका, जिल्हा, विभागीय व राज्यस्तरावर व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरातून येणाऱ्या खेळाडूंना दर्जेदार क्रीडा मैदान, उत्तम निवास व भोजनाची सुविधा मिळावी, तसेच त्यांना स्पर्धेचा आनंद घेत आपल्या गुणवत्तेला योग्य दिशा देता यावी, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. खेळाडूंना सुविधा देणे ही केवळ जबाबदारी नसून, भविष्यातील सक्षम क्रीडापटू घडविण्याची आमची बांधिलकी आहे.- सौ. चैतालीताई काळे.
