Uncategorized

वाढत्या गुन्हेगारीवर आळा घाला आमदार आशुतोष काळेंच्या पोलीस प्रशासनाला सूचना….

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरात वाढत असलेली गुन्हेगारी, चेन स्नॅचिंगच्या घटना तसेच बंद घरफोडीच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस निरीक्षकांची संयुक्त आढावा बैठक घेत कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी शहर व ग्रामीण भागातील गुन्हेगारीच्या घटनांचा सविस्तर आढावा घेतला. विशेषतः नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या चेन स्नॅचिंग, बंद घरफोडी, चोरी तसेच इतर गंभीर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, बस स्थानक परिसर तसेच संवेदनशील भागांमध्ये नियमित पोलीस गस्त वाढविणे, रात्रीच्या वेळी विशेष गस्त पथके तैनात करणे, संशयित व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रभावी निगराणी ठेवणे आणि गुन्हेगारांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करावी.

गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबरोबरच, नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देण्याच्या सूचना दिल्या. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविणे, तसेच नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले. कोपरगाव शहर व तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरण मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पोलीस प्रशासनाने अधिक दक्षता घेऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करावे असे निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला दिले.
बैठकीत उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी शहर व ग्रामीण भागात सुरू असलेल्या गुन्हे प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दिली. आगामी काळात गस्त वाढविणे, तपासाची गती वाढविणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे उघडकीस आणण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.या बैठकीस कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे व ग्रामीण पोलीस पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आदींसह पोलीस उपनिरीक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *