Uncategorized

कोपरगावातील वाढत्या चोऱ्या व गुन्हेगारीवर तातडीने कठोर कारवाई करा – आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या पोलिस प्रशासनाला सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात गेल्या दोन दिवसांत घडलेल्या सलग तीन गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चैन स्नॅचिंग तसेच विविध ठिकाणी घरफोडी या घटनांची आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनाला तातडीने कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोपरगावसारख्या शांत शहरात अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडणे ही चिंतेची बाब असून नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे आमदार कोल्हे यांनी स्पष्ट केले. या सर्व घटनांतील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यावी तसेच अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर कायमस्वरूपी आळा बसावा यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

शहरातील संवेदनशील भागांमध्ये दिवस-रात्र पोलीस गस्त वाढविणे, रात्री विशेष पेट्रोलिंग सुरू करणे, संशयित व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवणे तसेच सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर करून गुन्हेगारांना तातडीने जेरबंद करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलिस प्रशासनाने कोणतीही हयगय न करता कठोर आणि परिणामकारक कारवाई करावी. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी दिल्या आहेत.

यावेळी नागरिकांनीही सतर्क राहून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *