Uncategorized

शिर्डी विधानसभा मतदारसंघात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू…

गणना प्रपत्र न भरल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाणार – उपविभागीय अधिकारी माणिक आहेर…
कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २१८ शिर्डी विधानसभा मतदारसंघासह राज्यभरात ‘मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम -२०२६’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांना गणना प्रपत्र (एन्युमरेशन फॉर्म-ईएफ) वितरित करीत आहेत. मतदारांनी हे प्रपत्र अचूक भरून संबंधित बीएलओकडे सादर न केल्यास त्यांचे नाव आगामी प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाही, असे आवाहन शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी केले आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेले गणना प्रपत्र अचूक भरून देणे प्रत्येक मतदारासाठी आवश्यक आहे. कुटुंबातील कोणतीही एक सज्ञान व्यक्ती स्वतःच्या तसेच कुटुंबातील इतर सदस्यांच्या वतीने हे प्रपत्र भरून त्यावर स्वाक्षरी करू शकते. प्रत्येक मतदाराने प्रपत्रावर लावण्यासाठी एक पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो तयार ठेवावा. ज्या मतदारांचे गणना प्रपत्र प्राप्त होणार नाही किंवा भरलेले प्रपत्र सादर केले जाणार नाही, अशा मतदारांची नावे ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.
ज्या मतदारांची २००२ च्या मतदार यादीशी अद्याप जुळवणी (मॅपिंग) झालेली नाही, त्यांनी आपल्या कुटुंबातील सज्ञान सदस्यांची किंवा आई, वडील, आजी अथवा आजोबा यांची आवश्यक माहिती संबंधित बीएलओकडे उपलब्ध करून द्यावी. योग्य जुळवणी झाल्यास पुढील सुनावणीची नोटीस मिळण्याची आवश्यकता टाळता येईल.

मतदार यादीतील माहिती अद्ययावत करण्यासाठी आणि त्रुटी दूर करण्यासाठी मतदारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. १ जुलै १९८७ पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःचा जन्मदिनांक किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारा कोणताही एक विहित पुरावा सादर करावा. १ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ या कालावधीत जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःचा तसेच आई किंवा वडील यांपैकी एकाचा विहित पुरावा सादर करावा. २ डिसेंबर २००४ नंतर जन्मलेल्या व्यक्तींनी स्वतःचा तसेच आई आणि वडील या दोघांचाही विहित पुरावा सादर करणे आवश्यक आहे. विहित पुराव्यांमध्ये जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र तसेच शासन, बँक किंवा टपाल विभागाने जारी केलेली ओळखपत्रे आदी कागदपत्रांचा समावेश आहे.

या कार्यक्रमांतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) यांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहकार्य करून लोकशाही बळकट करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहनही श्री.आहेर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *