
कोपरगाव प्रतिनिधी:-
“गेली दोन वर्ष कोरोनामुळे शिक्षणक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात नसल्यामुळे अध्ययन प्रक्रिया पूर्ण बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तरीही को. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. अशोकराव रोहमारे व सचिव अॅड. संजीवदादा कुलकर्णी यांच्या शिस्तबद्ध नेतृत्वात आमच्या महाविद्यालयाने ऑनलाईन अध्यापनाद्वारे विद्याथ्र्यांना सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले. विद्यार्थ्याचा सर्वांगीन विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वयंशिस्त यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे. ऑनलाईन अध्यापन काळात विद्यार्थ्याकडे मोबाईल नव्हते त्यामुळे अध्यापकांनी पालकांना विश्वासात घेऊन ते घेण्यास भाग पाडले व ऑनलाईन अध्यापन यशस्वीरित्या पूर्ण केले.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे केले. के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानवरून बोलत होते..
प्राचार्य पुढे म्हणाले की, “पालकांनी आपल्या पाल्याप्रती जागरूक राहून, तो देशाचा परिपूर्ण नागरिक बनेल यासाठी प्रयत्नशील रहावे. विद्यार्थी ५ तास महाविद्यालयात व १८ तास पालकांसोबत असल्याने पालकांनीही आपली जबाबदारी लक्षात घेऊन पाल्याला मोबाईल दिला, पण त्याचा वापर तो कसा करतो ते काळजीपूर्वक बघावे. कमीतकमी दोन महिन्यातून एकदा महाविद्यालयात येऊन आपल्या पाल्याच्या प्रगतीची चौकशी करावी. आपला पाल्य योग्य मार्गाने जात आहे की नाही याकडेही लक्ष दिल्यास तो नक्की यशस्वी होईल.”
या प्रसंगी प्रा. एन. जी. बारे. (उपप्राचार्य, के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, चासनळी) यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच श्री. महेश वाकचौरे, श्री. निवृत्ती सोनवणे, श्री. राजेंद्र बोरनारे, श्री. भगवान सूर्यवंशी आदी. पालक प्रतिनीधीनी आपापल्या पाल्यांच्या अडचणी मांडत महाविद्यालयाविषयी समाधान देखील प्रकट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री. ए. एफ. सूर्यवंशी व कु. एम. पी. निळेकर यांनी केले व शेवटी प्रा. जी. एन. डोंगरे यांनी आभार मानले. त्या मेळाव्या बहुसंख्य पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते. पालक मेळाव्यानंतर शिक्षक पालक भेट हा विशेष उपक्रम संपन्न झाला.
