
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- चाळीस वर्ष सत्ता भोगूनही कोपरगाव शहराचा भिजत ठेवलेला पाणी प्रश्न आमदार आशुतोष काळे यांनी चार वर्षात सोडवून दाखविला त्यामुळे कधी १६ दिवसांनी तर कधी २१ दिवसांनी मिळणारे पाणी कोपरगावकरांना चार दिवसाआड उन्हाळ्यात देखील नियमित मिळत आहे हे कोपरगावकरांना माहित आहे. मात्र ज्यांच्याकडे विकासदृष्टीच नाहीच त्यांना अजूनही पाच नंबर साठवण तलावाचे पाणी कोपरगावकरांना मिळते यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे नगरपालिकेची सत्ता मिळताच ५ नं. साठवण तलावाचे पाणी पुन्हा येसगावला नेले का? असा तिखट सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील गंगुले यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी कोल्हे गटाला प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी आणलेल्या निधीतून कोपरगाव शहरातील सुभद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, सभामंडप व सुशोभिकरण कामाचे श्रेय घेण्यासाठी रविवार (दि.१९) रोजी भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी सत्ताधारी कोल्हे गटाने केलेल्या गुंडागर्दीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोपरगाव नगरपरीषदेच्या सर्वसाधारण सभेवर टाकलेल्या बहिष्कारामुळे कोल्हे गटाची चांगलीच नाचक्की झाली आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकाराबाबत सारवासारव करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांचा सुनील गंगुले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून चांगलाच समाचार घेतला आहे. सुनील गंगुले यांनी पुढे असे म्हटले आहे की, ५ नंबर साठवण तलावातून थेट शहराला पाणी येत नाही असे कोल्हे गटाचे म्हणणे आहे, ते खरे आहे का? कारण ज्यावेळी १ ते ४ नंबर साठवण तलावाचे खोलीकरणाचे काम सुरु असतांना त्या साठवण तलावात अनेक गुप्त पाईप लाईन त्यावेळी विद्यमान नगराध्यक्षांना आढळून आल्या होत्या. त्या पाईप लाईनने साठवण तलावातील पाणी येसगावला कुठे जात होते आणि कोपरगावकरांना पाण्यापासून कसे वंचित ठेवले जात होते हे त्यावेळी कोपरगावकरांनी पाहिले आहे.
त्यामुळे मिळालेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्तेचा दुरुपयोग करून नगराध्यक्षांनी ५ नंबर साठवण तलावातून येसगावला गुप्त पाईपलाईन केल्या तर नाही ना? असा संशय येणे साहजिक आहे, कारण विरोधकच म्हणतात की, पाच नंबर साठवण तलावातून थेट शहराला पाणी येतं नाही त्यामुळे ५ नंबर साठवण तलावाचे पाणी कोपरगाव शहरात न येता हे पाणी पुन्हा येसगावला नेले का? असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत असून पाच नंबर साठवण तलावाचे पाणी जाते कुठे? याचे उत्तर सत्ताधारी कोल्हे गटाने कोपरगावच्या जनतेला दिले पाहिजे. तसं पाहिलं तर ५ नंबर साठवण तलाव होवू नये यासाठी कोणी किती राजकारण केलं. कोपरगावच्या जनतेची तहान भागू नये यासाठी कोण न्यायालयात गेलं हे कोपरगावकरांना माहित आहे आणि चाळीस वर्ष कोल्हे गटाने प्रत्येक निवडणूक पाणी प्रश्नावर काढली हे देखील कोपरगावकर जाणून आहेत. त्यामुळे ५ नंबर साठवण तलाव नेहमीच कोल्हे गटाच्या डोळ्यात खुपत होता आणि आजही कोल्हे गट ज्याप्रकारे बालिश विधान करीत आहे त्यावरून ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
कोपरगाव शहराच्या विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळविला असून या निधीतून ५ नंबर साठवण तलाव, कोपरगाव शहरातील रस्ते, शासकीय ईमारती, शहर सुशोभिकरण, स्मशानभूमी विकास, समाज मंदिरे अशी अनेक विकास कामे पूर्ण झाली आहे व विरोधक सोडून सर्व कोपरगावकरांना हि विकास कामे दिसत आहे. त्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतील ६७ कोटी निधीतून अनेक महत्वाची विकासकामे पूर्ण होवून नागरीकांच्या अडचणी कायमच्या दूर होणार होत्या. परंतु ज्याप्रमाणे ५ नंबर साठवण तलाव होऊ नये व नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू नये हीच मानसिकता डोक्यात ठेवून ६७ कोटी परत गेल्यामुळे सत्ताधारी कोल्हे गटाने या ६७ कोटी निधीतून होणाऱ्या विकासकामांपासून कोपरगावकरांना वंचित ठेवले आहे. कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता कोल्हे गटाकडे असतांना कोपरगाव शहराच्या विकासासाठी हा ६७ कोटी निधी त्यांच्यामुळेच परत गेला आहे यावरून शहरविकास विरोधी भूमिका कोणाची आहे हे स्पष्ट होत असून हे बिंग फुटू नये यासाठीच कोपरगाव नगरपरीषदेच्या सर्वसाधारण सभेला पत्रकारांना मज्जाव करण्यात आला होता. त्याबाबत प्रसिद्धी माध्यमांकडून कोल्हे गटाला चांगलेच शालजोडे लगावण्यात आल्यानंतर चोराच्या उलट्या बोंबा सारखा प्रकार करून हा निधी विरोधकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवला असल्याचे सांगत हात झटकले असले तरी आजपर्यंत कोल्हे गटाने एकच अजेंडा राबविला आहे. चांगले झाले तर आम्ही केले आणि वाईट झाले तर विरोधकांनी केले भलेही ते वाईट कोल्हेंकडून झाले असले तरी, कारण आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडून मोकळे व्हायचे हि कोल्हे गटाची जुनी परंपरा असल्याचे सुनील गंगुले यांनी म्हटले आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत गुंड मवाल्यांचे मतदान कसे चालले असा प्रश्न उपस्थित करून कोल्हे गटाच्या नगरसेवकांनीच ते गुंड मवाली असल्याचे मान्य केले आहे. आणि जरी तुम्ही म्हणता आम्ही मतदान केले तर ती तुमची अपरिहार्यता होती हे विसरू नका. तुमच्या प्रत्येक टीकेला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत गुंड मवाली कोण आहेत याची आकडेमोड कोपरगावकरांकडे आहे. त्यामुळे अशी गुंडागर्दी करण्यापेक्षा निधी परत जाणार नाही याची काळजी घ्या असा सल्ला सुनील गंगुले यांनी कोल्हे गटाला दिला आहे.
