कोपरगावच्या धार्मिक परंपरेत, श्रद्धेच्या गाभाऱ्यात आणि भक्तीच्या स्पंदनांत एक पवित्र स्थान आजही तेजाने उजळत आहे दत्तपार:- गोरे सर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
गोदावरीच्या शांत प्रवाहाजवळ वसलेले हे स्थान म्हणजे केवळ एक मंदिर नाही,
तर भक्ती, तपश्चर्या आणि गुरुभक्तीचा जिवंत इतिहास आहे.
जुन्या कथांमध्ये सांगितले जाते की “चोभे ” नावाच्या एका ब्रह्मचारी, भक्ताने इसमाने या पवित्र स्थळाची स्थापना केली. सुमारे १९०७ च्या सुमारास गोदावरीच्या काठी दत्तगुरूंची सेवा सुरू झाली, आणि त्या क्षणापासून या भूमीत दत्तभक्तीचे दिव्य तेज प्रज्वलित झाले.
पुढे १९१६ मध्ये जोशी परिवाराने या स्थानाला संस्थात्मक रूप दिले आणि ट्रस्टची स्थापना झाली.
आजही ही परंपरा जपणारी तीसरी पिढी या सेवेत आहे.
आज अध्यक्ष म्हणून रवींद्र कोऱ्हाळकर आणि त्यांच्यासोबत सर्व ट्रस्टी व कोपरगावातील दत्तभक्त मंडळ श्रद्धेची ही परंपरा निष्ठेने पुढे नेत आहे.
ही मंडळी फक्त व्यवस्थापन करत नाहीत, तर सेवा, समर्पण आणि भक्तीचा दीप अखंड तेवत ठेवत आहेत.
दत्तपाराचे महत्त्व इतके विलक्षण आहे की,
असे सांगितले जाते
स्वतः साईबाबांनीही येथे तपश्चर्या केली आणि
दत्तमहाराजांना आपल्या गुरूचे स्थान दिले.
मुंबईचे चांदोरकर बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत गेले असता,
साईबाबांनी त्यांना सांगितले….
“पहिले माझ्या दत्तगुरूंचे दर्शन घेऊन या, मग माझ्याकडे या.”
या एका वाक्यात दत्तपाराची आध्यात्मिक उंची किती महान आहे, याची जाणीव होते.
येथे दरवर्षी
सात दिवसांचे दत्तपारायण ,
तीन दिवसांचा दत्तयाग ,
आणि दत्तजयंतीचा भव्य उत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा होतो.
या ठिकाणी एक विशेष गोष्ट अनुभवायला मिळते…
इथे कोणाला बोलावले जात नाही.
दत्तमहाराजांचे सेवेकरी स्वतःहून ओढले जाऊन येथे येतात.
जणू काही दत्तगुरूंची अदृश्य कृपा
भक्तांच्या मनाला हलकेच हाक देते…
आणि पावले आपोआप दत्तपाराकडे वळतात.
रामनवमी, भागवत, दत्तपालखी, गुरुप्रतिपदा अशा अनेक उत्सवांमधून
कोपरगावची धार्मिक परंपरा आजही जिवंत ठेवण्याचे महान कार्य येथे सुरू आहे.
पूर्वीच्या काळात
दत्तपार, मुरलीधर मंदिर आणि सोमेश्वर मंदिर
ही कोपरगावच्या धार्मिक वैभवाची त्रयी होती
आणि आजही ती तितक्याच तेजाने उभी आहेत.
आज दत्तपाराचे स्वरूप अधिक सुंदर, अधिक भव्य करण्यासाठी
ट्रस्टी मंडळी प्रयत्नशील आहेत.
भक्त स्वतःहून पुढे येतात,
दान देतात,
आणि या पवित्र कार्यात सहभागी होतात.
दत्तपाराच्या महिम्याच्या कथा ऐकताना मन थक्क होते.
असे सांगितले जाते की महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालकही
पहाटे येवून प्रथम दत्तपाराचे दर्शन घेतात,
आणि मगच शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन करायला जातात.
ही गोष्ट ऐकताना मनात एकच भावना उमटते…
ही केवळ श्रद्धा नाही, तर दत्तगुरूंच्या कृपेचा चमत्कार आहे.
दत्तमहाराज म्हणजे
त्रिमूर्तींचे एकरूप दर्शन…
ब्रह्मा , विष्णू आणि महेश यांचे एकत्र तेज.
त्यांच्या चरणी नतमस्तक होताना
मनातील अहंकार विरघळतो,
दुःख हलके होते,
आणि आत्म्याला शांततेचा स्पर्श होतो.
म्हणूनच कोपरगावकरांच्या मनात एक श्रद्धा कायम जिवंत आहे….
दत्तपार म्हणजे केवळ एक स्थान नाही…
तो आपल्या श्रद्धेचा श्वास आहे,
आणि कोपरगावच्या आध्यात्मिक संस्कृतीचा तेजस्वी दीप आहे.”

श्री गुरुदेव दत्त
गोरे सर
कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *