दामूशेठ गुजराथी यांचे काळाच्या कुपीत जपलेलं आरोग्यधन:- गोरे सर….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगावच्या मातीला एक वेगळीच ओल आहे…
इतिहासाची, श्रद्धेची आणि परंपरेची .
त्या ओलाव्यातच रुजलेलं एक अमूल्य रोपटं म्हणजे
दामूशेठ गुजराथी यांचे आयुर्वेदिक काष्ट-औषधी दुकान.
सुमारे १२५ वर्षांपूर्वी, जेव्हा कोपरगावचं अस्तित्व
बिरोबा मंदिरापर्यंतच सीमित होतं…
आणि त्या काळात साईबाबा यांचा
सुगंध वातावरणात दरवळत होता,
तेव्हा दामोधरदास विठ्ठलदास गुजराथी यांनी
आरोग्यसेवेचा हा दीप प्रज्वलित केला.
हिंदीत ज्याला “ पनसारी की दुकान” म्हणतात,
ते हे दुकान केवळ व्यापारी केंद्र नव्हे,
तर आयुर्वेदाच्या ज्ञानाचा एक जिवंत ग्रंथ आहे.
या दुकानात मिळणाऱ्या औषधी म्हणजे जणू
निसर्गाच्या कुशीतून आलेली अमृतधारा
शंखपुष्पी मनःशांती देणारी,
जटामांसी चिंतनाला स्थिरता देणारी,
माका आरोग्याला तेज देणारा,
वाळा थंडावा देणारा,
दारूहळद , चित्तरक, संजीवणी, जहरकुसला
प्रत्येक औषध म्हणजे एक कथा, एक उपचार, एक विश्वास.
काळ बदलला… आधुनिक औषधांनी वेग घेतला,
पण आयुर्वेदाचं हे शांत, संयमी अस्तित्व
आजही तितकंच प्रभावी आहे.
आता तर नवी पिढी पुन्हा आयुर्वेदाकडे वळताना दिसते ..
हे या दुकानाच्या परंपरेचं मोठं यश आहे.
कोपरगाव तालुक्यातील असा कदाचित एकही व्यक्ती नसेल,
ज्याने या दुकानाची पायरी चढली नसेल.
आणि आज तर परदेशी भक्तही,
जंगलीदास महाराजांच्या आश्रमात येताना, जर्मनी-इटलीहून आलेले लोकही
या औषधी खजिन्याचा अनुभव घेण्यासाठी
या दुकानात पाऊल ठेवताना दिसतात.
या परंपरेची दुसरी पिढी .. प्रवीण दामोधर गुजराथी ,
आणि आता तिसरी पिढी .. प्रथम
ही परंपरा जिवंत ठेवत आहेत.
दुकान जरी जीर्ण वाटलं,
तरी त्यात दडलेलं ज्ञान अक्षय आहे.
औषधांच्या ढिगाऱ्यातून , त्या गूढ सुगंधातून ,
हवं ते औषध क्षणात शोधून काढण्याची
ही बाप-लेकांची कला म्हणजे
अनुभवाची पराकाष्ठा आहे.
हे दुकान म्हणजे केवळ औषध विक्रीचं ठिकाण नाही…
तर ती एक परंपरा, एक विश्वास ,
आणि निसर्गाशी नातं जोडणारी एक संजीवनी आहे.
“जिथे कुपीत नाही, तर परंपरेत साठवलेलं आरोग्य मिळतं…
तेच दामूशेठ गुजराथी यांचं आयुर्वेदिक दुकान!”

गोरे सर
सेवानिवृत शिक्षक
एस जी विद्यालय
कोपरगाव
९८५० ६१३ ६१२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *