संजीवनी युवा प्रतिष्ठानची शेकडो युवकांसह ‘शिवऊर्जा यात्रा’ किल्ले रायगडावर जाणार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
छत्रपतींच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले रायगड येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे ‘शिवऊर्जा यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. दिनांक २८ फेब्रुवारी रोजी कोपरगाव येथून युवकांचे प्रस्थान होणार असून या यात्रेद्वारे इतिहासाची सखोल माहिती जाणून घेणे तसेच किल्ले स्वच्छता अभियान राबविणे हा मुख्य उद्देश आहे.या मोहिमेसाठी मोठा प्रतिसाद युवकांकडून मिळतो आहे.निवास,भोजन व प्रवास वाहन व्यवस्था प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे.

छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची भूमी असलेल्या रायगड किल्ल्याला विशेष महत्वाचे स्थान प्रत्यकाच्या मनात आहे. स्वराज्याच्या राजधानीचा मान मिळालेल्या या गडावर युवकांना प्रत्यक्ष भेट देत इतिहासाचा अभ्यास करता यावा, त्यांच्या मनात राष्ट्राभिमान व सामाजिक बांधिलकीची भावना दृढ व्हावी, यासाठी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
दरवर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून युवकांना गडकिल्ल्यांवर घेऊन जाण्याची संकल्पना युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची आहे. गतवर्षी किल्ले शिवनेरी येथे अशीच यशस्वी मोहीम राबविण्यात आली होती. त्या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. यावर्षी रायगडासारख्या ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण किल्ल्याची निवड करून शिवकार्याची प्रेरणा अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या यात्रेदरम्यान इतिहास अभ्यासकांकडून मार्गदर्शन, स्वराज्यकालीन वास्तूंची माहिती, तसेच परिसर स्वच्छता अभियान राबवून ‘स्वच्छ गड सुरक्षित वारसा’ हा संदेश दिला जाणार आहे. युवकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला असून इतिहासातून ऊर्जा घेण्याचे कार्य केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *