
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- मुस्लीम बांधवांचा अतिशय आनंदाच्या असणाऱ्या “रमजान ईद” सणाचे औचित्य साधत कोपरगाव शहरातील मस्जिद व कब्रस्थानसाठी स्थानिक विकास निधीतून भरीव निधी देणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली असून मुस्लीम बांधवांना रमजान ईद सणाची अनोखी भेट देवून मुस्लीम समाजाचा आनंद द्विगुणीत केला आहे.
कोपरगाव तालुक्यातील बहुतांश गावातील मुस्लीम समाजाच्या मस्जिद व कब्रस्थानचा प्रश्न मागील काही वर्षापासून अनुत्तरीत असून त्या मस्जिद व कब्रस्थानच्या विकासासाठी निधी मिळावा याबाबत आमदार आशुतोष काळे सातत्याने पाठपुरावा करीत असून यापूर्वी चांदेकसारे, चास नळी व शिरसगाव-सावळगाव या गावातील कब्रस्थानसाठी २५ लाख रुपये निधी मंजूर करून आणला असून यामध्ये चांदेकसारे १० लाख, चास नळी ८ लाख व शिरसगाव-सावळगावसाठी ७ लाख असा एकूण २५ लाख रुपये निधी दिला आहे. कोपरगाव शहरातील मस्जिद व कब्रस्थानमध्ये मुस्लीम बांधवांना येत असलेल्या अडचणींची दखल घेवून आपल्या स्थानिक विकास निधीतून “रमजान ईद” च्या पूर्व संध्येला नूर इस्लाम मस्जिद (मर्कज), नवीन कब्रस्तान (१०५), जुना कब्रस्तान (मौलवी गंज) कोर्ट रोड व मदरसा मिफ्ता उल उलुम (खडकी) साठी भरीव निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले असून लवकरच मस्जिद व कब्रस्थानमधील अंतर्गत विकासकामांना सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे मुस्लीम समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ज्याप्रमाणे कोपरगाव शहरातील मस्जिद व कब्रस्थानच्या अंतर्गत सोयी सुविधांसाठी भरीव निधी दिला त्याप्रमाणेच कोपरगाव विधानसभा मतदार संघातील इतर गावातील मस्जिद व कब्रस्थानच्या विकासासाठी देखील टप्प्या टप्याने निधी देणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
मागील वर्षी देखील रमजान ईदच्या सणावर कोरोनाचे सावट होते व यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचे सावट आहे. मुस्लीम बांधवांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता योग्य ती काळजी घ्यावी व रमजान ईदची पवित्र नमाज घरातूनच अदा करावी असे आवाहन करून सर्व मुस्लीम बांधवांना “रमजान ईद” च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
