
कोपरगाव प्रतिनिधी:-
(राहुरी विद्यापीठ):-
शेतीमध्ये यांत्रिकीकरण गरजेचे झाले आहे. शेतीक्षेत्रात ट्रॅक्टर्सचे महत्व वाढले आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टर्सचलीत अवजारांच्या तंत्रज्ञानात मोठी क्रांती घडत आहे. शेतीमधील महत्वाच्या कामांकरीता लागणार्या अवजारांमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर होत असून यासाठी आपलेही सर्वोत्कृष्ठ योगदान द्या असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि महाविद्यालयामध्ये दीक्षारंभ-2025 आणि अभिजात मराठी भाषा सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. सचिन नलावडे बोलत होते. याप्रसंगी या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणुन अहिल्यानगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका श्रीमती दया जेठे व सोलिस यानमार ट्रॅक्टर्सचे विभागीय व्यवस्थापक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी इंजि. महेश इथापे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मालेगाव, काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, अक्षय उर्जा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. विरेंद्र बारई, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र गडगे व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव वैभव बारटक्के उपस्थित होते.
यावेळी डॉ. सचिन नलावडे पुढे म्हणाले की मराठी भाषा खुप समृध्द आहे. ती शिका व स्वतःही समृध्द व्हा. मराठी भाषेबद्दल तुम्हाला अभिमान असला पाहिजे. श्रीमती दया भोर मराठी भाषा या विषयावर आपल्या भाषणात म्हणाल्या की तुमच्या भाषेतून तुमची संस्कृती, समाजातील तुमचे स्थान, तुुमची आर्थिक स्थिती, तुमची मनस्थिती व सध्याची अवस्था समजते. मराठी भाषेतून व्यक्त होण्यासाठी तीचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक आहे. त्यासाठी वाचन महत्वाचे आहे, तो एक छंद आहे. त्यामुळे भाषेचे सौंदर्य वाढेल. तुम्ही बोलू शकाल, लिहू शकाल. आपल्याकडून ज्ञानाची निर्मिती झाली तरच आपण आपल्या मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळवून देवू शकतो. इंजि. महेश इथापे कृषि अभियंत्यांसाठी विपणनातील संधी या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की भारतात सद्यस्थितीत 47 टक्के शेतीतील यांत्रिकीकरण झाले आहे. दिवसेंदिवस यांत्रिकीकरणाचा वेग वाढत आहे. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. शेतीच्या यांत्रिकीकरणामध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता, ड्रोन, सेंसर्सरचा वापर वाढत आहे. याचे शिक्षण घ्या. विद्यार्थ्यांना उद्देशुन ते म्हणाले की यश सहज मिळत नाही, त्यासाठी भरपूर मेहनत करा, शिकत रहा. आयुष्यामध्ये सतत शिकण्याची तयारी ठेवा. तुम्ही जे शिक्षण घेत आहात ते तुम्हाला पुढील ध्येय गाठण्यासाठी सक्षम करील.
यावेळी अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने मराठी असे आमुची मायबोली या विषयावरील निबंध स्पर्धेतील विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक निरज पठारे, द्वितीय क्रमांक रेणूका झनान, तृतीय क्रमांक अस्मीता मोरे, साक्षी घाडगे व सानिका लाकडे तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक विजेता शुभम गायकवाड यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कैलास कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय घाणेकर याने तर आभार डॉ. महेश पाचारणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
