
कोपरगाव प्रतिनिधी:-
पुणे येथील भारतीय आयुर्वेद संस्थेद्वारा आयोजित “आयुर्वेद संभाषा परिषद २०२४” या राष्ट्रीय परिषदेत पुणे येथील सुमंत मुळगावकर सभागृहात तेलंगना राज्याचे राज्यपाल मा.श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या शुभहस्ते तसेच वैद्य सदानंद सरदेशमुख, वैद्य समीर जमदग्नी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. रामदास आव्हाड यांना “आयुर्वेद गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

भारतीय आयुर्वेद संस्थेद्वारा “धन्वंतरी पुरस्कार सोहळा व आयुर्वेद संभाषा परिषद २०२४” चे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. सर्व आयुर्वेद संघटनांना एकत्र घेऊन आयुर्वेद हिताचे कार्य करण्यासाठी संस्थेने “आयुर्वेदाची दिशा व भविष्याचा वेध” या विशेष चर्चासत्राचे आयोजन ही करण्यात आले होते. या संस्थेचे अध्यक्ष खासदार मा.डॉ. अमोल कोल्हे, कार्याध्यक्ष डॉ. प्रशांत दौंडकर पाटील हे आहेत. महाराष्ट्रातील आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व आयुर्वेद हिताचे कार्य करणाऱ्या वैद्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये कै. वैद्य विलास नानल सर यांना मरणोत्तर आयुर्वेद रत्न पुरस्कार, वैद्य सदानंद सरदेशमुख, वैद्य समीर जमदग्नी व वैद्य श्रुती जमदग्नी यांना धन्वंतरी जीवनगौरव पुरस्कार व वैद्य विनय वेलणकर, वैद्य रामदास आव्हाड, व वैद्य विनायक टेंभूर्णीकर यांना आयुर्वेद गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी पुरस्कार स्वीकारतांना डॉ. आव्हाड यांनी संस्थेचे आभार मानत सर्व आयुर्वेद संघटनांनी एकत्र येऊन कार्य केल्यास आयुर्वेदाचे सुवर्ण दिवस लवकरच सर्वांना दिसतील असे म्हटले.
