कोपरगाव प्रतिनिधी
(अहिल्यानगर):- भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतांना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त वाहने आणण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत.
नामनिर्देशन पत्र दाखल करतांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करतांना कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणण्यास तसेच कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यातस प्रतिबंध घालण्यात आला आहे. हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
