कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी कामिका एकादशीनिमित्त बालगोपाळाचा दिंडी सोहळा गुरुवारी (दि.१३) सकाळी १० ते १२ यावेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिंडी सोहळ्यातील बालगोपाळ वारकऱ्यांचा शाळेच्या प्रांगणातील रिंगण सोहळ्यासह इयत्ता दुसरीतील अनामिका भाटी व इयत्ता चौथीतील सिद्धांत मोहोरे या दोघांनी विठ्ठल-रखुमाई यांची साकारलेली वेशभूषा विशेष आकर्षण ठरली. गेल्या वर्षीपासून शाळेतील विद्यार्थ्यांना दिंडीचा आनंद घेता यावा, यासाठी दुसऱ्या आषाढी एकादशीला हा दिंडी सोहळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दिंडी सोहळा पार पडला.
या दिंडी सोहळ्यात २०० पेक्षा जास्त बालगोपाळ वारकरी विधार्थ्यांनी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला होता. यावेळी विध्यार्थ्यासाठी दोन पालख्या सजविण्यात आल्या होत्या. एका पालखीत पुस्तक तर दुसऱ्या पालखीत झाडाचे छोटेसे रोपटे ठेवण्यात आले होते. यावेळी सजवलेल्या पालख्या, झेंडेकरी, डोक्यावर तुळस घेऊन विद्यार्थिनी, लेझीम, ढोल, टाळांच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करीत शाळेपासून प्रस्थान होऊन संपूर्ण गावातून हा दिंडी सोहळा मिरविण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांनी विठ्ठल – रखुमाई यांच्यासह बालगोपाळ वारकऱ्यांचे पूजन केले. तसेच खाऊ दिला. यावेळी बालगोपाळांनी तसेच पालकांनी फुगडी खेळत दिंडी सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. दिंडी सोहळा पुन्हा शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर भव्य रिंगणाने भक्तीमय वातावरणात विठ्ठलाच्या नामघोषात आसमंत दुमदुमुन गेला होता. याप्रसंगी बालगोपाळ वारकऱ्यांना खाऊ तसेच महाप्रसादाचे वाटप करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली. दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक चंद्रकांत माळी, शिक्षक दत्तात्रय चव्हाण, गोरक्षनाथ साबळे, भागा जाधव, गोविंदा पोरे, पांडुरंग खाडे या शिक्षकासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येत पालक उपस्थित होते.


फोटोओळी:-
वारीतील जिल्हा परिषद शाळेतील बालगोपाळ वारकऱ्यांचा रिंगण सोहळा. तसेच विठ्ठल – रखुमाई यांची वेशभूषा धारण केलेले विद्यार्थी.
