
गणेश कारखान्याच्या निवडणुकीत थोरात-कोल्हे युतीच्या श्री गणेश परिवर्तन मंडळाचा ऐतिहासिक दणदणीत विजय; विवेकभैय्या कोल्हे यांचा करिष्मा; राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा सुपडा साफ…
कोपरगाव प्रतिनिधी:-
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या राहाता तालुक्यातील गणेशनगर येथील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि कोपरगावच्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील श्री गणेश परिवर्तन मंडळाने एकूण १९ पैकी १८ जागा जिंकून ऐतिहासिक दणदणीत विजय मिळवला. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या चुरशीच्या निवडणुकीत थोरात-कोल्हे युतीने राज्याचे महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला पराभवाचा दणका देत अस्मान दाखविले. विखे पाटलांच्या पॅनलला फक्त आणि फक्त १ जागा मिळाली. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचा आशीर्वाद व वारसा घेऊन युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी आ. बाळासाहेब थोरात यांच्या साथीने या निवडणुकीत श्री गणेश परिवर्तन मंडळाला मोठे यश मिळवून देण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कुशल, समर्थ व प्रभावशाली नेतृत्वाचा करिष्मा या निवडणुकीत दिसून आला.
गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकूण १९ जागांसाठी शनिवारी (१७ जून) निवडणूक झाली. आज सोमवारी (१९ जून) मतमोजणी होऊन या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील श्री गणेश परिवर्तन मंडळ व विद्यमान महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळ यांच्यात चुरशीचा व रंगतदार सामना झाला. या ऐतिहासिक निवडणुकीत थोरात-कोल्हे युतीच्या श्री गणेश परिवर्तन मंडळाने एकूण १९ पैकी १८ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला, तर विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाला फक्त १ जागा मिळाली. थोरात-कोल्हे युतीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्याच होम ग्राऊंडवर चारीमुंड्या चीत करून आपली ताकद दाखवून दिली आहे. या निवडणुकीत विखे पाटील गटाचा सुपडा साफ झाला आहे. ‘गणेश’ च्या सभासद शेतकऱ्यांनी आ. बाळासाहेब थोरात व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यावर विश्वास दाखवत गणेश कारखान्याची एकहाती सत्ता थोरात-कोल्हे युतीच्या ताब्यात दिली आहे. गणेश कारखाना विखे पाटलांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून परिवर्तन घडविण्याचा निर्धार सभासदांनी केला होता आणि सभासदांची ही इच्छा या निकालाने अखेर पूर्ण झाली आहे.
श्री गणेश परिवर्तन मंडळाचे विजयी उमेदवार
या निवडणुकीत बाळासाहेब थोरात व विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील श्री गणेश परिवर्तन मंडळाचे विजयी झालेले उमेदवार असे -ऊस उत्पादक मतदारसंघ-पुणतांबा गट-अनिल सोपान गाढवे, संपत नाथाजी चौधरी, शिर्डी गट-बाबासाहेब दादा डांगे, विजय भानुदास दंडवते, राहाता गट- ॲड. नारायणराव ज्ञानेश्वर कार्ले, गंगाधर पांडुरंग डांगे, संपत कचरू हिंगे, अस्तगाव गट -महेंद्र चांगदेव गोर्डे, बाळासाहेब कुंडलिक चोळके, नानासाहेब काशिनाथ नळे, वाकडी गट- अरुंधती अरविंद फोपसे, सुधीर वसंतराव लहारे, विष्णुपंत शंकर शेळके, इतर मागासवर्ग मतदारसंघ-अनिल राजाराम टिळेकर, भटक्या-विमुक्त जाती-जमाती विशेष मागास वर्ग प्रतिनिधी मतदारसंघ-मधुकर यशवंतराव सातव, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी मतदारसंघ-अलेश शांतवन कापसे, महिला प्रतिनिधी मतदारसंघ-शोभाबाई एकनाथ गोंदकर, कमलबाई पुंडलिक धनवटे.
विखे पाटलांच्या विरोधात सभासदांचा कौल; थोरात-कोल्हे युतीकडे एकहाती सत्ता
गणेश कारखान्याच्या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलच्या विरोधात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व कोपरगावच्या माजी आमदार, भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांचे सुपुत्र सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी एकत्र येऊन पॅनल उभा केला होता. शेवटच्या टप्प्यात स्वत: माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यादेखील प्रचारात उतरल्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळाली. विखे, थोरात, कोल्हे या दिग्गज नेत्यांचा सहभाग, प्रचारसभांना झालेली मोठी गर्दी व आरोप-प्रत्यारोपांमुळे या निवडणुकीला विधानसभा निवडणुकीचे स्वरूप आले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ नगर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत विखे पाटलांचा झालेला पराभव व थोरात-कोल्हे युतीने मिळवलेला ऐतिहासिक विजय हा नगर जिल्ह्यासह सबंध महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. गणेश कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी या निवडणुकीत विखे पाटील यांची दडपशाही, हुकूमशाही झुगारून त्यांच्या विरोधात कौल दिला असून, या कारखान्याची सत्ता थोरात-कोल्हे युतीच्या ताब्यात दिली आहे. या निवडणुकीत दारूण पराभव झाल्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना जबरदस्त हादरा बसला आहे. युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या साथीने या ऐतिहासिक निवडणुकीत बलाढ्य विखे पिता-पुत्रांना पराभूत करून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेने विवेकभैय्या कोल्हे यांच्या बावनकशी समर्थ नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. या निवडणूक निकालाचे परिणाम आगामी काळात शिर्डी, कोपरगाव व संगमनेर विधानसभा मतदारसंघातील राजकारणावर होणार आहेत.
कोल्हे व थोरात यांनी विखे पिता-पुत्रांना दाखवले अस्मान
माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी आर्थिक डबघाईमुळे बंद पडलेला गणेश सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करून ३८ वर्षे तो यशस्वीरीत्या चालवला. त्यांनी गणेशनगर परिसरातील शेतकरी, कामगार व अन्य सर्व समाजघटकांचे जीवन समृद्ध बनवले. बंद पडलेली सहकारी साखर कारखानदारी कशी चालवावी हे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले होते. या ‘कोल्हे पॅटर्न’ ची संपूर्ण महाराष्ट्रात प्रशंसा झाली होती. स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी प्रतिकूल काळातही बंद अवस्थेतील श्री गणेश सहकारी साखर कारखाना चालू करून तो चांगल्या प्रकारे चालवला. शेतकरी सभासद, कारखाना व कर्मचारी यांचे हित जोपासत या परिसराचे भाग्य उजळण्याचे काम स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष स्व. भानुदासराव दंडवते पाटील, ॲड. नारायणराव कार्ले, माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे व संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करून उसाला योग्य भाव देऊन सभासद शेतकरी व कामगारांचे हित जोपासत हा कारखाना उत्तम रीतीने चालवला. एकूण ६३ वर्षांपैकी ३८ वर्षांहून अधिक काळ माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचा करिष्मा ‘गणेश’च्या निवडणुकीत दिसून आला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत गणेश कारखान्याला घरघर लागली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले वर्चस्व राखण्यासाठी २०१३-१४ मध्ये तत्कालीन संचालक मंडळाला चौकशीच्या फेऱ्यात अडकवून गणेश कारखाना आठ वर्षांसाठी करार तत्त्वावर चालवायला घेतला. हा आठ वर्षांचा करार संपलेला असतानाही आता त्यांनी पुन्हा पाच वर्षांनी करार वाढवून घेतला आहे. विखे पाटलांच्या एकाधिकारशाही व दडपशाहीमुळे गणेश कारखान्याचे व गणेशनगर परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पार वाटोळे झाल्याचा आरोप करून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कोपरगावच्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी एकत्र येऊन विखे पाटलांना आव्हान दिले होते. थोरात व कोल्हे यांनी नियोजनबद्ध झंझावाती प्रचार करून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना अस्मान दाखवत ‘गणेश’ मधील त्यांची सत्ता उलथवून टाकली आहे.
कोल्हे-थोरात युतीची रणनीती यशस्वी
सहकारी संस्था या शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागाच्या विकासाच्या कामधेनु असल्याने स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी सहकार क्षेत्रात कधीही राजकारण आणले नाही. गणेशनगर परिसरात स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांना मानणारे असंख्य नेते, कार्यकर्ते आहेत. श्री गणेश कारखाना व माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हेसाहेब यांचा अतूट संबंध असल्याने गणेशनगर परिसरातील ही कामधेनु वाचविण्यासाठी व पुनश्च एकदा विकासाचा ‘कोल्हे पॅटर्न’ राबवण्याच्या दृष्टीने संचालक मंडळ निवडणुकीत विवेकभैय्या कोल्हे यांनी लक्ष घालण्याचे साकडे शेतकरी व सभासदांनी त्यांना घातले होते. त्यामुळे स्व. कोल्हेसाहेबांच्या शिकवणीप्रमाणे गणेशनगर परिसरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व गणेश कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे विवेकभैय्या कोल्हे यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी युती करून या निवडणुकीत उडी घेतली. गेल्या आठ वर्षांत विखे पाटलांनी गणेश कारखाना व्यवस्थित चालवला नाही. त्यामुळे यावेळी परिवर्तन घडवा. आम्ही गणेश कारखान्याचा कारभार संगमनेरच्या भाऊसाहेब थोरात व कोपरगावच्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याप्रमाणे चांगल्या प्रकारे करू, असे आश्वासन देत विवेकभैय्या कोल्हे व बाळासाहेब थोरात यांनी सभासदांना या निवडणुकीत परिवर्तन घडविण्याचे आवाहन केले होते. अखेर या निवडणुकीत कोल्हे-थोरात युतीची रणनीती यशस्वी ठरली असून, विवेकभैय्या कोल्हे, बाळासाहेब थोरात व श्री गणेश परिवर्तन मंडळाच्या सर्व नेते, कार्यकर्ते व सभासद शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाला दारूण पराभव स्वीकारावा लागला आहे.
या निवडणुकीत श्री गणेश परिवर्तन मंडळाचा ऐतिहासिक विजय झाल्याने कोल्हे-थोरात युतीचे नेते, कार्यकर्ते, सभासद शेतकऱ्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.
या निवडणुकीत श्री गणेश परिवर्तन मंडळाला बहुमतांनी विजयी केल्याबद्दल सर्व सभासद शेतकरी मतदार बंधू-भगिनींचे तसेच निवडणूक प्रचारासाठी गेले महिनाभर अहोरात्र परिश्रम घेतलेले राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर,संगमनेर तालुक्यातील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी, हितचिंतक, कर्मचारी तसेच सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे विवेकभैय्या कोल्हे व बाळासाहेब थोरात यांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत.
