
कोपरगांव कृषी उत्पन्ऩ बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज
योजनेची प्रभावी अंमलबजावणी…
कोपरगांव प्रतिनिधी:-
अवकाळी पाऊस व प्रतिकुल परिस्थितीमुळे शेतकरी पुर्ण उध्वस्त़ झाला आहे. यामध्ये भर म्हणजे शेतीमालाला भाव नसेल तर शेतकरी फार मेटाकुटीला येतो. यासाठी पर्यायी उपयोग होतो तो शेतमाल तारण कर्ज योजनेचा. म्हणुन कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीने शेतमाल तारण कर्ज योजना ही शासनामार्फत राबविण्यात येणारी योजना प्रकर्षाने राबविण्याचा निर्णय नवनिर्वाचित संचालक मंडळाने घेतला आहे.
या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल महाराष्ट्र राज्य़ वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवून माल ठेवलेली वखार पावती बाजार समितीकडे सादर केल्यास त्यावर शेतमाल तारण कर्ज दिले जाते. या शेतमाल तारण कर्ज योजनेवर अवघे 6 टक्के दराने (180 दिवसाकरीता) कर्ज दिले जाते. गहु, ज्वारी, बाजरी, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, मुग, उडिद, सुर्यफुल या शेतीमालाच्या एकुण किंमतीवर 75 टक्के पर्यंतचे कर्ज वार्षिक 6 टक्के व्याजदराने योजनेस सुरूवात केल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या मुदतीकरीता अदा करण्यात येते.
त्यामुळे आपला शेतीमाल सुरक्षित ठेवण्याकरीता तसेच वाढत्या बाजारभावाचा फायदा घेण्याकरीता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती श्री.साहेबराव पा.रोहोम यांनी केले आहे.
या कर्ज योजनेचा लाभ शेतकरी श्री.भाऊसाहेब रंगनाथ येवले या शेतक-यास देण्यात आला. श्री.येवले यांना शेतमाल तारण कर्ज योजनेचा धनादेश सभापती श्री.साहेबराव पा.रोहोम यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उपसभापती श्री.गोवर्धन पा. परजणे व सर्व संचालक मंडळ, सचिव श्री.एन.एस.रणशुर व कर्मचारी उपस्थित होते.
