महाराष्ट्रात निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्थेची आवश्यकता, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचा प्रस्ताव ; मुख्यमंत्री कार्यालयाकडून नगरविकास विभागास कार्यवाहीच्या सूचना…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
धार्मिक विधी(घरगुती/सार्वजनिक) नंतरचे निर्माल्य नदी,समुद्र, ओढे, नाले येथे विसर्जन केले जाते. घरगुती धार्मिक पुजा, सार्वजनिक धार्मिक स्थळांचे पुजा येथून फुले, पाने यांचे एकत्रितपणे निर्माल्य संकलन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरावर निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था आणि शास्रोक्त विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे.याबाबत प्रस्ताव तयार करुन स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्व्हेक्षण विभागास पाठविला असल्याची माहिती स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी दिली आहे.
सदर प्रस्तावाची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्थाबाबत नगरविकास विभागास कळविले आहे.
याबाबत खालील प्रमाणे उपाययोजना करता येईल.
१) स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये किमान १ निर्माल्य संकलनासाठी वाहन व्यवस्था आठवड्यातून एक दिवस करण्यात यावी. (नगरपालिका, महानगरपालिका येथे निर्माल्य संकलनासाठी लोकसंख्या नुसार वाहनांची संख्या आणि निर्धारित दिवसांचा कालावधी वाढीव ठरवता येवू शकतो.)
२) निर्माल्य संकलन वाहनात दोन स्वतंत्र कप्पे करण्यात यावे.त्यातील एक कप्प्यात घरगुती धार्मिक पुजा, सार्वजनिक धार्मिक स्थळांचे पुजा येथून फुले, पाने यांचे एकत्रितपणे निर्माल्य संकलन करण्यात यावे.तर दुस-या कप्प्यात जुने जिर्ण फोटो, मुर्ती, देवाची वस्रे संकलन करता येईल.
३) निर्माल्य संकलनातील पहिल्या कप्प्यातील फुले पाने यांची शास्रोक्त विल्हेवाट/खत निर्मिती/उपयुक्त उत्पादन करता येईल. ( निर्माल्यापासून विविध उत्पादन करिता बचत गटांना सहभागी करता येईल.) तर दुसऱ्या कप्प्यातील जुने फोटो, मुर्ती यांची विशिष्ट मांडणी करुन त्या गावात संग्रहालय/ शास्रोक्त विसर्जन करता येईल.
४) निर्माल्य संकलन स्वतंत्र वाहनामुळे नियमित कचरा संकलन गाडीतील ईतर कच-यात निर्माल्य मिश्रण क्रिया टाळता येवून निर्माल्याचे शास्रोक्त महत्त्व ठेवता येईल.
५) नदी, समुद्र, नाले, ओढे, विहिरी यात विसर्जित होणारे निर्माल्याचे प्रमाण घटून नदी, समुद्र, नाले, ओढे, विहिरी यासह सर्व जलसाठे स्वच्छ राहण्यासाठी मदत होईल.
असे प्रस्तावात म्हटले आहे. सदर प्रस्ताव संचालक, स्वच्छ भारत अभियान, महाराष्ट्र, स्वच्छ सर्व्हेक्षण यांना सादर केला आहे. पुढील कार्यवाहीसाठी प्रधानमंत्री कार्यालय, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्वच्छता मंत्री,मुख्य सचिव,नगरविकास, ग्रामविकास विभागास प्रस्तावाची माहिती दिली आहे.
या आधीही स्वच्छ भारत अभियानाचे माध्यमातून स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी मांडलेल्या संकल्पनेतून कचराकुंडी असलेली ठिकाणे कचराकुंडी मुक्त करुन तेथे सुशोभीकरण करणे आणि कचरा वाहतूक करणारी वाहनांवर ध्वनिक्षेपक बसवून स्वच्छता जनजागृती करण्याच्या दोन्ही कल्पना स्वच्छतेला व्यापक परिणामकारक ठरत आहेत.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शहर, गावात निर्माल्य संकलन वाहनासाठी नियोजन आणि पुढील शास्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासनाकडून स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असल्याचे समाधान स्वच्छतादूत सुशांत घोडके व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *