केवळ पुस्तकापुरते मर्यादीत न राहता विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास साध्य करावा:- जिल्हाधिकारी सालीमठ…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकापर्यंतच मर्यादीत न राहता कौशल्य विकास त्यांनी साध्य करावा. त्यासाठी स्नेहसंमेलनासारखे कार्यक्रम उपयुक्त आहेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी संवत्सर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमातून केले.
संवत्सर जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी हेही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रारंभी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत तर गट शिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी प्रास्ताविक केले. शाळेसाठी नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत खा. सदाशिव लोखंडे यांनी दिलेल्या ७२ इंची इंटर अॅक्टीव्ह बोर्डचे उद्घाटन जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याहस्ते करण्यात आले. तर शाळेच्या आवारात तसेच प. पू. राजधरबाबा प्राणवायू स्मृतीवनात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याहस्ते वृक्षरोपण करण्यात आले. शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करून दोन्हीही अतिथींनी समाधान व्यक्त करुन कौतूक केले.


संवत्सरची शाळा इतर शाळांपेक्षा क्रियाशील व समृध्द शाळा आहे. राज्यातील इतर शाळांनी या शाळेचा आदर्श घेतला तर शैक्षणिक स्तर उंचावण्यास निश्चितच हातभार लागेल असे सांगून जिल्हाधिकारी सालीमठ यांनी शाळेत मुलींच्या सोईसाठी सायकल बँक हा उपक्रम सुरु केला तर त्यातून मुलींना शिक्षण घेण्यासाठी अधिक चालना मिळू शकते. आठवी वर्गातील मुलीने शाळेच्या बँकेतून सायकल घेतल्यावर ती दहावीपर्यंत म्हणजे तीन वर्षे वापरायची आणि त्यानंतर ती पुन्हा बँकेत (शाळेत) जमा करायची. जमा केलेल्या सायकली पुन्हा दुसऱ्या मुलींना वापरण्यासाठी द्यायच्या. असा हा उपक्रम असून शाळेने सायकल बँक सुरु केली तर, सर्वप्रथम मी माझ्यातर्फे सायकल भेट देईल असे जाहीर करुन या शाळेतून मलाही चांगली प्रेरणा घेता आली असल्याचे सालीमठ यांनी भाषणातून सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संवत्सर परिसरात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांनी राबविलेले समाजोपयोगी प्रकल्प पाहून समाधान व्यक्त केले. माणसाजवळ ईच्छाशक्ती आणि प्रयत्न करण्याची जिद्द असेल तर काहीही शक्य करता येते हे संवत्सर येथे आल्यावर दृष्टीस पडते. संवत्सर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेला ग्रामविकास राज्याला आदर्शवत असल्याचेही गौरवोद्गार श्री ओला यांनी काढले.
स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातून मुलांनी विविध देशभक्तीपर, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक तसेच लोकगीतांवर नृत्य सादर करून उपस्थित प्रक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक संदीप वाघमारे यांनी केले तर मुख्याध्यापक फय्यजखान पठाण यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *