कोपरगाव मतदारसंघात स्नेहलताताई कोल्हे पुन्हा आमदार होऊन विकासाचा झंझावात येणार, वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
मागील विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातून स्नेहलताताई कोल्हे या अत्यंत अल्पशा मतांनी पराभूत झाल्या; पण तरीही या पराभवाने त्या खचल्या नाहीत. आज त्या आमदार नसल्या तरीही जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. या मतदारसंघात स्नेहलताताई कोल्हे या पुन्हा आमदार होऊन विकासाचा झंझावात येणार, पुन्हा विजयाचा झेंडा फडकणार यात माझ्या मनात शंका नाही. आगामी विधानसभा निवडणूक आपल्याला व्याजासह जिंकायची आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत स्नेहलताताई कोल्हे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच शास्त्रशुद्ध अभ्यास व नियोजन करून कामाला लागावे, असे आवाहन राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
वन व सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार आज बुधवारी (१६ नोव्हेंबर) कोपरगाव दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी येसगाव येथील कोल्हे वस्तीवर भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पुढील विधानसभा निवडणुकीत स्नेहलताताई कोल्हे आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितच आमदार होतील आणि श्री साईबाबांच्या आशीर्वादाने त्यांना आणखी मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळेल, असे सुतोवाच ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, डॉ. मिलिंददादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमितदादा कोल्हे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविकाका बोरावके, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली अर्पण केली. ना. मुनगंटीवार यांनी पुढील निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी स्नेहलताताई कोल्हे यांच्या हाती विजयाचा ध्वज सुपूर्द केला. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कोपरगाव मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सुधीरभाऊंचे भरीव सहकार्य – स्नेहलताताई कोल्हे
स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०१४ ते २०१९ या काळात भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अर्थ व नियोजनमंत्री म्हणून केलेले काम मी जवळून पाहिले आहे. वृक्षलागवड, पर्यावरण संतुलन, वृक्ष, वन व वन्यजीव संवर्धनासाठी त्यांनी उत्तम काम केले. आताही ते वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य विकासमंत्री म्हणून अतिशय चांगले काम करत आहेत. खाते कोणतेही असो सुधीरभाऊ आपली जबाबदारी चोखपणे बजावत आपल्या कार्यातून स्वत:चा ठसा उमटवतात हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. ‘डाऊन टू अर्थ’ म्हणजे विनम्र, माणुसकी जपणारा, सदैव मदतीला धावून जाणारा अभ्यासू व कार्यकुशल नेता अशी त्यांची ओळख आहे. नुसती झाडे आणि माणसे जपण्याचे नाही तर वाघाला जपण्याचे काम ते करतात. मी पाच वर्षे आमदार असताना सुधीरभाऊंनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनहिताचे विविध प्रश्न आणि विकासकामे मार्गी लावण्यासाठी मला खूप मदत केली, असे सांगून स्नेहलताताई कोल्हे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांच्या कार्याचे स्मरण
राजकारणात जीव ओतून काम करणारे स्व. वसंतदादा पाटील, स्व.रत्नाप्पा कुंभार असे जे काही बोटावर मोजण्याइतके नेते महाराष्ट्रात होऊन गेले त्यापैकी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब हे एक होते. स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांनी विकासकामांचा डोंगरच उभारला. जनहिताचे अनेक प्रश्न सोडवले. त्यांचा शेती, पाणी, साखर उद्योगाचा सखोल अभ्यास होता. त्यांनी अनेक नेते, कार्यकर्ते घडविले. सत्तेत असो किंवा नसो, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हे परिवार नेहमी पुढे असतो. स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांच्या निधनानंतर यावर्षी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी एकविचाराने कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करून आदर्श निर्माण केला आहे. आज केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असून, कोपरगाव मतदारसंघातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे, असेही स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले.
स्नेहलताताई कोल्हे यांचे कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न – ना. सुधीर मुनगंटीवार
सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचे स्मरण करून ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, स्व. शंकरराव कोल्हे यांनी महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात खूप मोठे काम केलेले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज त्यांची तिसरी पिढी उत्तम काम करत आहे. मागील पाच वर्षांपूर्वी स्नेहलताताई कोल्हे आमदार होत्या. मीही आमदार होतो, मंत्री होतो. अनेकदा वारसा हा पित्याकडून मुलाकडे येत असतो; पण सासऱ्याकडून सुनेकडे जनतेची सेवा करण्याचा वारसा मिळाला हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे वैशिष्ट्य आहे. स्नेहलताताई कोल्हे यांनी पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात कोपरगाव मतदारसंघातील विविध प्रश्न विधानसभेत मांडून ते सोडविण्याचे काम प्रामाणिकपणे केले. आकाशाएवढी उंची असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या कुटुंबीयाची सून म्हणून त्यांनी प्रवेश केला; पण विधान भवनात, मंत्रालयात वावरताना त्यांच्या चेहऱ्यावर कधीही गर्वाचा, अहंकाराचा लवलेशही दिसला नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी प्रामाणिकपणे काम केले, आजही ते हे काम करत आहेत.
कोपरगावात पुन्हा भाजपच्या विजयाचा झेंडा फडकणार
भारतीय जनता पक्षाचा जो देशभक्तीचा विचार आहे. ‘नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी। नमो पुण्यभूमी जियेच्याय कामी, पडो देह माझा सदा ती नमी मी’ ही देशभक्तीची भावना आहे. तुमच्या मनातील हा संकल्प पूर्ण व्हावा अशी मी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. गेल्या निवडणुकीत स्नेहलताताई कोल्हे अगदी थोड्या मतांनी पराभूत झाल्या; परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत स्नेहलताताई कोल्हे या भरघोस मतांनी निवडून येतील, असा विश्वास आज मला तुमच्याकडे पाहून वाटतो आहे. कोपरगाव मतदारसंघातून स्नेहलताताई कोल्हे यांच्या रूपाने भाजपचा उमेदवार विजयी करण्यासाठी सर्व बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास करून आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *