उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शासनाने नुकसान भरपाई द्यावी:-राजेश परजणे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव तालुक्यात गेल्या चार – पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक गांवामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी शिरुन घरांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे शासन पातळीवरुन तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केली.
श्री परजणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविलेल्या निवेदनातून श्री परजणे पाटील यांनी कोपरगांव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. कोपरगांव तालुक्यात गुरुवार दि. ८ सप्टेंबरपासून वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह दररोज पडत असलेल्या पावसामुळे तालुक्याच्या बहुतांशी भागातील पिके भूईसपाट झाली असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. या नैसर्गिक हानीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे अत्यंत गरजेचे आहे.
दि. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने कोपरगांव तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनेवाडी, पोहेगांव, चांदेकसारे, डाऊच बुद्रुक, घारी, जेऊरकुंभारी या गावांना प्रामुख्याने वादळी पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे. डाऊच येथे वीज पडून जनावरे दगावल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे. तालुक्यात पूर्व भागातही पावसामुळे शेतातील सोयाबीन, मका, कपाशी, भईमूग, बाजरी, तूर, उडीद, मूग, कांदा रोपे तसेच भाजीपाला पिकांसह ऊसाचे देखील प्रचंड नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणची शेती पाण्यामुळे वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी मोठी झाडी, पत्र्याची व मातीची घरे, झोपड्या जमिनदोस्त झालेल्या आहेत. काही ठिकाणचे शेतबंधारे फुटल्याने पिकांत पाणी शिरुन पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. ग्रामीण भागातील रस्ते जलमय झाल्याने दैनंदिन दळणवळणावर विपरीत परिणाम झालेला आहे. पिकांच्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अनेक शेतातल्या केळी, डाळींब, पपई, चिक्कू, पेरुच्या बागा कोलमडून पडल्या आहेत. शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. फळबागांसाठी लाखो रुपये खर्च करुनही नैसर्गिक आपत्ती ओढावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हाता तोंडाशी आलेला घास अचानक हिरावल्याने शेतकरी चिंतातूर झालेले आहेत. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला असताना बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. मागील वर्षीच्या नुकसान झालेल्या पिकांचीही भरपाई अद्याप मिळालेली नाही. तरीही कर्जे काढून यंदा शेतीचे नियोजन केलेले असताना अतिवृष्टी आणि वादळामुळे पुन्हा शेतकऱ्यांना संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. या आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना आर्थिक मदतीशिवाय पर्याय राहिलेला नाही.
शासनाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे, फळबागांचे तसेच उद्ध्वस्त झालेल्या घरांचे तालुका कृषी विभाग, महसूल विभाग, मा. गटविकास अधिकारी यांना पंचनामे करण्याबाबतच्या सूचना देवून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देऊन आधार द्यावा अशीही मागणी श्री परजणे पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *