
प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र झोपेतच!
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गावर दोन-अडीच वर्षांपूर्वी भुयारी मार्ग बांधण्यात आले असून, त्या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. या भुयारी मार्गाचे काम सदोष झाल्यामुळे त्यामध्ये पाणी साचून वाहनधारकांचे हाल होत आहेत. शिवाय आजूबाजूच्या शेतातही हे पाणी घुसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहेे. मात्र, याकडे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे.
जनतेला वारंवार भेडसावणाऱ्या या समस्येची भाजपच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी दखल घेतली असून, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आणि तालुका प्रशासनाने त्वरित पाहणी करून ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी, अशी मागणी सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे. याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई आणि नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. कोपरगाव तालुक्यातील दहा गावांतून समृद्धी महामार्ग गेला असून, या महामार्गावर विविध ठिकाणी इंटरचेंज आणि भुयारी मार्ग (अंडरपास) बांधण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन-अडीच वर्षांपूर्वी हे काम झाले आहे. कोपरगाव-पुणतांबा राज्यमार्गावर तसेच देर्डे कोऱ्हाळे शिवारात खडकी नाला, वारी-भोजडे रोड, धोत्रे-वारी, संवत्सर-कान्हेगाव रोडवर समृद्धी महामार्गाच्या खालून वाहतूक करण्यासाठी भुयारी मार्ग (अंडरपास) बांधण्यात आले आहेत. संबंधित कंत्राटदार कंपन्यांकडून या भुयारी मार्गाचे काम चुकीच्या पद्धतीने झाले असून, पाण्याचा निचरा होण्यासाठी कसलीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्यामुळे भुयारी मार्गात पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनधारकांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तीन दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक तर खोळंबलीच;शिवाय लगतच्या लोकवस्तीत आणि शेतात पाणी साचल्याने अतोनात नुकसान झाले. भुयारी मार्गात साचलेल्या पाण्याला बाहेर पडण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते; पण तशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे पाणी भुयारी मार्गालगतच्या शेतात घुसल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे. वाहतुकीवरही परिणाम होत आहे. कोपरगाव-पुणतांबा राज्यमार्गावर बांधलेल्या भुयारी मार्गाची उंची हवी तेवढी न ठेवता सदोष बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक कंटेनर अडकून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आताही या भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे शिवारातील समृद्धी महामार्ग व गोदावरी उजवा कालव्याच्या मधोमध असलेल्या आठ ते दहा शेतकऱ्यांच्या सुमारे 40 एकर शेतीत कंबरेएवढे पाणी साचत असल्याने या परिसरातील शेती अक्षरश: पडीक झाली आहे. आता तर थेट घरामध्ये, कांदा चाळीमध्ये पाणी शिरत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. समृद्धी महामार्गाची निर्मिती करताना राज्य रस्ते विकास महामंडळ आणि संबंधित कंत्राटदार कंपन्यांकडून स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा कोणताही विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात समृद्धी महामार्गावर आणि भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, हे पाणी आजूबाजूला असलेल्या शेतात घुसून सुपीक जमिनीचे अतोनात नुकसान होत आहे. देर्डे कोऱ्हाळे शिवारात समृद्धी महामार्गावर बांधलेल्या भुयारी मार्गात साचलेले पाणी लगतच्या शेतात आणि वस्तीत घुसल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने समृद्धी महामार्ग आणि भुयारी मार्गात साचलेले पाणी या भागातील आनंद शिंदे आणि इतर काही शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यामुळे पिके पाण्याखाली येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार कंपन्यांकडून याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही. कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे आणि तालुका प्रशासनही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
