
सप्ताहाच्या सेवेतून अध्यात्मिक उर्जेची प्राप्ती:- ना. आशुतोष काळे...
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कोकमठाण येथे पार पडलेल्या अखंड हरीनाम सप्ताहात वाट्याला आलेली सेवा करण्याची मिळालेली संधी हे माझे परमभाग्य असल्याच्या भावना ना. आशुतोष काळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

कोकमठाण येथे परमपूज्य सदगुरु श्री गंगागिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने सरला बेटाचे मठाधिपती ह.भ.प. रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची ह.भ.प. रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने मोठ्या उत्साहात लाखो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. या सप्ताह काळात लाखो भाविकांनी विविध प्रकारची सेवा करून पुण्य संचय केला. सर्व सामान्य सेवकांप्रमाणे सुरुवातीपासून माझ्या वाट्याला आलेली सेवा करत असतांना मला देखील काही पुण्य मिळाले ते माझे परमभाग्य आहे. प्रत्येकाला तनमनधनाने देहभान विसरायला लावणारा हा भक्तीचा सोहळा याची देही याची डोळा जवळून अनुभवायला मिळाला.
मागील सात दिवस संपूर्ण कोपरगाव तालुका भक्तीमय झाला होता.सप्ताह सोहळ्यात दिवसागणिक भाविकांच्या गर्दीचे विक्रम नोंदविले गेले सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी भाविकांची अगणित उपस्थिती असतांना देखील सप्ताह यशस्वीपणे पार पडला. त्याबद्दल सप्ताह कमिटी, कोकमठाण व पंचक्रोशीतील नागरिकांचे मोठे योगदान असून प्रत्येकाने केलेली सेवा हा भक्ती आणि शिस्तीचा अनोखा संगम पहायला मिळाला. या सप्ताहात सेवा करत असतांना अध्यात्मिक उर्जेची प्राप्ती होत असून या ऐतिहासिक भक्ती सोहळ्यात सेवा करण्याची मिळालेली संधी सदगुरु श्री गंगागिरीजी महाराजांचा आशीर्वाद होता असे ना. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
