नविन रेशनकार्ड स्टेशनरी शिल्लक नसल्याने कोपरगावात लाभार्थ्यांचे हाल:- साहेबराव रोहोम…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव शहर व विधानसभा मतदार संघातील रहिवासीयांनी तसेच दुबार रेशनकार्ड धारकांनी तहसिल कार्यालय येथे नविन रेशनकार्ड मिळावी म्हणून गेल्या अनेक महिन्यापासुन प्रक्रिया पूर्ण दिली आहे मात्र नविन रेशनकार्ड स्टेशनरी शिल्लक नसल्याने या लाभार्थ्यांना रेशनकार्ड मिळत नाही तेंव्हा संबंधीत विभागाने तात्काळ ही स्टेशनरी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कोपरगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
श्री. साहेबराव रोहोम यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी जनआक्रोश आंदोलन घेवुन त्यात याबाबतचे सविस्तर निवेदन दिलेले आहे. मात्र त्यावर अद्यापही कोपरगांव तहसिल कार्यालयाकडे नविन रेशनकार्ड स्टेशनरी मिळालेली नाही, परिणामी ज्या लाभार्थ्यांनी नविन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका, विभक्त शिधापत्रिका यासाठी नांव नोंदणी करून आवश्यक ते कागदपत्रे देवुनही या लाभार्थ्यांना शिधापत्रिका मिळत नाही. तहसिलदार विजय बोरूडे तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व संबंधीत यंत्रणेस नविन रेशनकार्ड स्टेशनरी मिळावी म्हणून भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मागणी करून त्याचा पाठपुरावा केलेला आहे तरी या लाभार्थ्यांना तात्काळ नविन रेशनकार्ड द्यावे असेही तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *