
कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी फॅक्टरी):-
राहुरी फॅक्टरीच्या प्रसादनगर भागातील आई व वडील असे दिनही पालक गमावलेल्या अनाथ मुलांना आज प्रहार जनशक्ती पक्ष व महाराष्ट्र राज्य कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन प्रत्येकी एक स्कूल बॅग, सहा वह्या, तीन पेन, एक कंपास बॉक्स आदी शालेय साहित्य दिले आहे.
प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे सचिव प्रशांत कराळे, प्रहार चे राहुरी फॅक्टरी शहर संघटक प्रभाकर कांबळे, प्रसादनगर शाखा उपाध्यक्ष सनी सोनवणे आदींसह नागरिक उपस्थित होते.
निंभेरे सोसायटी चे माजी चेअरमन कै ज्ञानदेवराव ढेपे यांचे प्रथम पुण्यस्मरनाचे निमित्ताने व त्यांचे स्मरणार्थ ढेपे परिवाराचे वतीने वरील साहित्य देणेत आले असल्याचे प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले.
पुढे बोलताना ढुस म्हणाले की, कोरोनाने एकल झालेल्या देवळाली प्रवरा हद्दीतील सर्व कोरोना एकल महिलांना यापूर्वी दिवाळी भाऊबीज निमित्त साडी आणि फराळ वाटप करून संघटनेने अनोखी भाऊबीज साजरी केली आहे, तसेच अत्यंत गरीब कुटुंबातील पाचवी पर्यंतच्या नऊ एकल मुलींना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र वाटपही नुकतेच संघटनेच्या माध्यमातून करणेत आले असून मा. ना. बच्चूभाऊ कडू यांचा जन्मदिन आम्ही एकल मुलांना शालेय साहित्य वाटप करून साजरा केला आहे. आत्तापर्यंत संघटनेच्या माध्यमातून जवळपास ६०० बालकांना बाल संगोपन योजना लागू करणेसाठी हातभार लावला असून या योजनेतील ११०० रुपये प्रतिमाह आर्थिक मदत २५०० रुपये करणेसाठी संघटना प्रयत्नशील असल्याचेही ढुस यांनी यावेळी सांगितले.
यानंतर या एकल महिलांसाठी लवकरच एक उद्योग उभारून त्यांच्या हाताला कायमस्वरूपी काम देऊन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे ढुस यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.
