कोपरगाव प्रतिनिधी:-
“ज्ञानी माणसे समाजासाठी आवश्यक असली, तरी ज्ञानी माणसे-सोबतच गुणी माणसेही आवश्यक असतात, तरच मानवी मूल्यांचे जतन करता येऊ शकते, त्यामुळेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ज्ञानप्राप्ती करण्याबरोबरच आपल्या अंगी असणा-या गुणांची जपणूक करावी” असे आवाहन कोपरगांव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. शांताराम गोसावी यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ त्यांच्या शुभहस्ते व कोपरगांव नगरपालिकेच्या उप-नगराध्यक्षा श्रीमती मीनलताई खांबेकर, संस्थेचे सचिव अॅण्ड संजीव कुलकर्णी, संस्थेचे विश्वस्त मा. संदिप रोहमारे, माजी नगराध्यक्ष मा. पद्मकांतजी कुदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अशोकराव रोहमारे होते.
श्री. गोसावी पुढे म्हणाले की, “कोरोना काळात आम्ही प्रशासनात काम करीत असताना आमच्यावर ताण होता. मात्र अनेकांकडे पैसे असूनही मानवी मूल्यांचा अभाव जाणवला. त्याचमुळे विद्यार्थ्यांनी ज्ञानी होण्या-बरोबरच गुणी व्हावे, आपले ध्येय व जीवनमूल्ये निश्चित करावी, आज आपल्या महाविद्यालयात तालुक्यात नसतील एवढी संशोधन केद्रें आहेत. त्यात संशोधन करणाज्या विद्यार्थ्यांनी आपले संशोधन समाजापयोगी कसे हाईल, त्याची दक्षता घ्यावी. जीवनात आपणास जे स्वप्न बघतो, ते पूर्ण करताना ज्यांनी आपली मदत केली, त्या आई, वडिल, शिक्षण, आपली भूमी यांची आठवण ठेवावी”
श्री. पद्मकांतजी कुदळे याप्रसंगी म्हणाले की, “विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेतात व पदवी प्राप्त झाली की, आपणास उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होईल, असे त्यांना वाटते. मात्र त्याबरोबरच साहित्य, चित्रकला, संगीत, वर्गरे कलांमध्ये आपण रमावे. कारण या ललितकला जीवन कसे जगावे, हे सांगत असतात व त्यातूनच आपल्या देशाचा सुजाण नागरिक घडू शकतो. ” तर संस्थेचे सचिव अॅड. संजीव कुलकर्णी म्हणाले की, “या महाविद्यालयावर विद्यार्थ्यांनी आरंभापासूनच प्रेम केले. पूर्वी महाविद्यालयात होडिने यावे लगायचे. काही मूले यायची पण होडितच बसून परत जायची आज मात्र पुलामुळे महाविद्यालयाची प्रगती झाली आहे. महाविद्यालयात अनेक बाबी घडत असतात, त्या सर्वांचा त्यांनी आनंद घ्यावा. आज पारितोषिक प्राप्त झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो”
याप्रसंगी श्रीमती मीनतलाई खांबेकर बोलताना भावूक झाल्या, त्या म्हणाल्या की, “माझे पती या महाविद्यालयाचे विश्वस्त होते, त्यावेळी मी अनेकदा त्यांच्या सोबत यायचे, त्यासर्व आठवणी आज मला येताहेत. त्यामुळे मी अधिक न बोलता यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते व थांबते”
अध्यक्षीय समारोप करताना मा. श्री. अशोकराव रोहमारे म्हणाले की, ” आमचे मित्र व संस्थेचे विश्वस्त कै. अशोकराव खांबेकर हे अत्यंत हसतमुख व्यक्तिमत्व होते. ते आले की गंभीर असलेले वातावरण खेळकर व्हायचे; संस्थेबद्दल त्यांना अत्यंत आस्था होती तसेच संजीव कोद्रे कवी मनाचे विश्वस्त होते. या दोघांच्या जाण्याचे संस्थेचे कधीन भरून निघणारे नुकसान झाले आहे.”
” मा. शांताराम गोसावी साहेब यांनी बिकट असस्थेत शिक्षण घेतले व ते छात्रसेनेमध्ये होते, तसा मीही होतो. आमच्या पैकी प्रत्येकाला त्यावेळी छात्रसेवा अनिवार्य होती, कारण त्यावेळी 1962 चे युध्द सुरू झाले होते. जागतिक परिस्थिती पाहता मला आजही असे वाटते की, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना छात्रसेनेचे प्रशिक्षण हे अनिवार्य करावे, मी अध्यक्ष झालो त्यावेळी 1200 विद्यार्थी महाविद्यालयात शिकत होते. आज ही संख्या 7000 झाली आहे, महाविद्यालयात आज अत्याधुनिक सर्व सेवा उपलब्ध झाल्या असून, सध्या स्पोर्टस क्लब सुरू केला आहे, त्याला गावक-याचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. लवकरच महाविद्यालयाच्या नविन 7 मजली इमारतीचे काम सुरू करण्यात येत असून, कोपरगांवात प्रथमच शुटींग रेंज व स्पोर्ट अकॅडमी सुरू करीत आहोत. या सर्व कामासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. गोसावी साहेब यांचे उत्तम सहकार्य लाभले, त्याचा मनस्वी आनंद आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तावित करतांना प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आलेख सर्वांसमोर कथन केला. वार्षिक अहवालाचे वाचन प्रा. डॉ. वसुदेव साळुंके व एम. एम. भोंडवे यांनी केले. याप्रसंगी शौक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, इ. क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या जवळपास 150 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देवून प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच याप्रंसगी पीएच.डी ही पदवी व राष्ट्रीय व राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार झालेल्या प्रा. डॉ. के. एल. गिरमकर, प्रा.डॉ. बी. डी. गव्हाणे, प्रा. डॉ. एस. बी. कुटे, प्रा. डॉ. संजय दवंगे, प्रा. डॉ. व्ही. सी. ठाणगे, प्रा. डॉ. एन.आर. दळवी, प्रा. डॉ. एस.एल. अरगडे, प्रा. डॉ. एस. जी. कोंडा, प्रा. डॉ. एस.बी. खोसे, प्रा. डॉ. आर.ए. जाधव, प्रा. वाय. पी. शिंदे, प्रा. डॉ. विठ्ठल लंगोटे, या प्राध्यापकांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. एस. के . बनसोडे व श्रीमती. एम. पी. निळेकर, प्रा. नीता शिंदे, श्री एम व्ही कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा. बी.आर सोनवणे यांनी केले.

फोटो ओळ:-
के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कोपरगांव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. शांताराम गोसावी
