
कोपरगाव प्रतिनिधी
(मुंबई):-
ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. 8 जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. या अगोदर तब्येत बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. यापूर्वी 27 जानेवारी रोजी लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे व्हेंटिलेटरही काढण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांच्या तब्येत खालावली आणि पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.आज सकाळी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “लतादीदींचं जाणं शब्दातीत आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या पाईक म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना स्मरणात ठेवतील. चाहत्यांच्या मनावर गारुड घालणारा त्यांचा मंत्रमुग्ध आवाज स्तिमित करतो. लतादीदींची गाणी आपल्या मनात विविध भावनांची रुंजी घालतात. भारतीय चित्रपटांचं स्थित्यंतर त्यांनी अनुभवलं,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच, नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “चित्रपटांच्या पल्याड, भारताच्या विकासासाठी त्या सदोदित आग्रही असत. विकसित आणि सक्षम भारत त्यांना पाहायचा होता. लतादीदींचा वैयक्तिक स्नेह मला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्याशी झालेलं बोलणं मी कधीच विसरू शकणार नाही. लतादीदींच्या जाण्याने देशवासीयांना झालेल्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी बोललो आणि शोकभावना व्यक्त केल्या”, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नितीन गडकरी फोटो स्रोत,TWITTER “लता मंगेशकर यांच्या जाण्याने देशाची हानी झाली आहे. पिढ्यान् पिढ्या त्यांची गाणी लोक ऐकतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना करतो. त्यांचं जाणं धक्का आहे. त्याला सहन करण्याची आपल्याला शक्ती मिळो,” अशा भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.
‘मीच स्वत:ला घडवलं’ मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात 28 सप्टेंबर 1929 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचं जन्मनाव हेमा होतं. मात्र,वडिलांच्या एका नाटकात लतादीदींनी लतिका नावाचं पात्र साकारलं. तेव्हापासून सगळेच त्यांना लता म्हणून हाक मारायचे आणि अशाप्रकारे ‘लता’ हे नाव त्यांना मिळालं. त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर स्वतः उत्तम गायक, नाट्य-कलावंत आणि संगीत नाटकांचे निर्माते होते. लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या पाच भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. त्यांच्या भावंडांनीही आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत आणि गायन क्षेत्रात नावलौकिक मिळवला. एकदा लतादीदी म्हणाल्या होत्या, “मीच स्वतःला घडवलं आहे. लढायचं कसं हे मी शिकले. मला कधीच कुणाची भीती वाटली नाही. मात्र, मला जे मिळालं ते मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं.”
