
कोपरगाव प्रतिनीधी:-
जिल्हा रुग्णालय, अहमदनगर च्या एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभागाच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त (१२ जानेवारी ) " उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना एड्स संक्रमणाचे मार्ग याविषयी शिक्षण देणे योग्य की अयोग्य " या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाचा विद्यार्थी योगेंद्र निलेश मुळे यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली. पारितोषिकाचे स्वरूप रु. २०००/- व प्रशस्तीपत्र असल्याचेही डॉ.यादव म्हणाले.
डॉ.यादव पुढे म्हणाले की, मुळे योगेंद्र हा बीड येथील एका सामान्य परिवारातील विद्यार्थी असून आमच्या महाविद्यालयातील वसतिगृहात राहून तो विज्ञान शाखेतील पदवीचे शिक्षण घेत आहे. अभ्यासाबरोबरच वक्तृत्व, वादविवाद व वाङमय मंडळातील विविध उपक्रमामध्ये सतत सहभागी होऊन आपल्या कलागुणांनी महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घालत आहे.
योगेंद्र मुळे यास वाङमय व वादविवाद मंडळाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. जिभाऊ मोरे , डॉ. गणेश देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सदस्य मा. संदीप रोहमारे, सचिव ऍड. संजीव कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.
