विदेशी दारूवरील करकपातीप्रमाणे राज्यशासनाने डिझेलच्या करात कपात करून वाहतुकदारांना दिलासा द्यावा:- राजेंद्र फड…

कोपरगाव

राज्य सरकारकडून डिझेलवरील कर कमी करण्याची नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..!!

कोपरगाव प्रतिनीधी
(नाशिक):-
केंद्र शासनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने डिझेलवरील कर कमी करून वाहतूकदारांना दिलासा द्यावा अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी यांनी निवेदन दिले आहे.
नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्रान्सपोर्ट उद्योग हा देशातील अर्थव्यवस्थेतील महत्वाचा कणा आहे. मात्र डिझेलची होत असलेली दरवाढीमुळे ट्रान्सपोर्ट उद्योग पूर्णपणे अडचणीत आला आहे. या दरवाढीचा परिणाम भाडेवाढीत होऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सर्वसामान्य नागरिक देखील यामुळे अडचणीत येत आहे. त्यामुळे डिझेलचे दर नियंत्रणात राहणे अतिशय महत्वाचे आहे. अगोदरच या उद्योगाला अनेक समस्या भेडसावत असून डिझेल दरवाढीमुळे अधिक अडचणीत असल्याचे म्हटले आहे. तसेच इतर राज्यात डिझेलचे दर कमी असल्याने इतर राज्यातून वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांना महाराष्ट्रातील वाहतुकदारांपेक्षा कमी दरात व्यवसाय करणे शक्य होत असल्याने राज्यातील वाहतुकव्यवसायाला मोठा फटका बसत असल्याचे म्हटले आहे.
पुढे म्हटले आहे की, डिझेलचे दरवाढ होत असल्याने केंद्र सरकारने काही अंशी कर कमी केला आहे. देशातही अनेक राज्यांनी डिझेलवरील कर कमी केले आहे. मात्र महाराष्ट्र शासनाकडून अद्यापही डिझेलवरील कर कमी करण्यात आले नाही. एकीकडे महाराष्ट्र सरकारने विदेशी मद्यावरील कर कमी केला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मद्यावरील कर अतिशय कमी आहे. एकीकडे मद्य उद्योगाला शासनाकडून सवलती देण्यात येत आहे. मात्र अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ट्रान्सपोर्ट उद्योगाला सरकारकडून दुजाभाव होतोय का असा प्रश्न ट्रान्सपोर्ट उद्योजकांमध्ये आहे. सरकारने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून डिझेलवरील कर कमी करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *