सोशल मीडिया विविध वृत्तपत्रे फेसबुक व्हाट्सअप ई-मेल आदी माध्यमातून काही क्षणात पोहोचत असल्याने कालानुरूप बदल होत आहे:- संजय कळमकर…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
एकविसाव्या शतकाला सामोरे जाताना बदलाची परिस्थिती सर्वत्र दिसत आहे त्याला संवाद माध्यमक्षेत्र देखील अपवाद आहे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत माहिती व तंत्रज्ञान पुरवण्याचे काम सोशल मीडिया विविध वृत्तपत्रे फेसबुक व्हाट्सअप ई-मेल आदी माध्यमातून काही क्षणात पोहोचत असल्याने कालानुरूप बदल होत आहे, ही बाब भूषणावह असली तरी विश्वास पात्र म्हणून वृत्तपत्रातील बातमी पाहिली व वाचली जाते असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर यांनी केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे होते. व्यासपीठावर सचिव अंबादास अंत्रे यांच्यासह शिक्षण संस्थेतील प्राचार्य प्राध्यापक विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विविध विभागातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा देऊन संस्थेविषयी माहिती दिली. संजीवनीतील प्रत्येक शैक्षणिक उपक्रमाची माहिती पत्रकार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. कोरोना काळात सर्वांनाच मोठा फटका बसला शैक्षणिक संस्थाही त्यातून सुटल्या नाहीत, आता शासनाने घातलेले निर्बंध नियम थोडेफार शिथील केल्याने परत जनजीवन पूर्वपदावर येत आहे या आठ दहा महिन्यांच्या कालावधीत पत्रकारांनी जीवावर उदार होऊन केलेले काम संस्मरणीय आहे असे सांगून पत्रकारां बद्दल गौरवोद्गार काढले.
श्री. नितीन कोल्हे अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले, पत्रकार व संजीवनी शिक्षण संस्थेचे अतूट नाते आहे. पत्रकारांच्या सुखदुःखात आम्ही नेहमी सहभागी होऊन वेळप्रसंगी मदतही करतो यापुढील काळातही अनेक अशी अनेक संकटे आपणावर आल्यास सर्वांना बरोबर घेऊन ती परतून लावण्यासाठी योग्य ते सहकार्य देऊ अशी ग्वाही दिली.
ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर यांनी सद्य परिस्थिती व पूर्वीच्या काळी असलेली परिस्थिती यात असलेले साम्य विषद करून इलेक्ट्रॉनिक मीडिया व वृत्तपत्र क्षेत्रात असलेल्या अडीअडचणींना पत्रकारांना कसे सामोरे जावे लागते याबाबत माहिती दिली. सामाजिक जाणिवेचे भान ठेवून प्रसंगी जीवावर उदार होऊन पत्रकार समाजात काम करत असतात. पत्रकार हे समाजाचा आरसा आहेत मात्र सध्या सोशल मीडियाचा काही बाबतीत अतिरेक झाल्यासारखे वाटते त्यामुळे वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांवर अनेक जण आजही विश्वास ठेवत आहे असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. प्रा. साहेबराव दवंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *