कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या सहकार्यामुळे यश मिळाले असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभागाने ५ नंबर साठवण तलावासाठी व वितरीकांसाठी आवश्यक असलेल्या १२० कोटी १२ लाख रुपये खर्चाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. परंतु शहरात विकास कामांना विरोध करण्याची विघातक पद्धत प्रचलित होत आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे शहरातील २८ विकासकामांना न्यायालयातून स्थगिती मिळविण्यात आली तशी स्थगिती ५ नंबर साठवण तलावाच्या कामाला कृपा करू कोणीही आणू नये अशी अपेक्षा महाविकास आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभागाने ५ नंबर साठवण तलावासाठी व वितरीकांसाठी आवश्यक असलेल्या १२० कोटी १२ लाख रुपये खर्चाला तांत्रिक मंजुरी दिली याबाबत आ.आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी वार्तालाप करतांना ते बोलत होते. यावेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, पुढील ३० वर्षाची कोपरगाव शहराची लोकसंख्या व वाढीव हद्द असलेल्या उपनगरातील लोकसंख्येचा विचार करून ४०० एम.एल.डी. क्षमतेच्या ५ नंबर साठवण तलावाचे सिमेंट काँक्रिटिकरणं करण्यात येणार आहे. त्याच बरोबर साठवण तलाव १,२,३ व ४ ची दुरुस्ती देखील करण्यात येणार आहे. संपूर्ण शहर व वाढीव हद्दीसाठी एकूण १९६ किलोमीटर वितरण व्यवस्थेची आवश्यकता असून आजमितीला १०५ किलोमीटरच वितरण व्यवस्था उपलब्ध असल्यामुळे उर्वरित ९१ किलोमीटर वितरण व्यवस्थेच्या कामाचा यामध्ये समावेश आहे. तसेच कोपरगाव बेट, ब्रिजलाल नगर, गोरोबानगर व संजयनगर याठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असून लक्ष्मीनगर येथील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
५ नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील ४ मीटर पर्यंतचे खोदकाम पवार साहेबांच्या सहकार्यातून शक्य झाले असून कोपरगाव नगरपरिषदेचे ७ कोटी रुपये वाचले आहेत. त्याचबरोबर त्या साठवण तलावातील निघालेले दगड,माती समृद्धी महामार्गासाठी वापरण्यात आल्यामुळे ही दगड माती टाकण्यासाठी येणारी जागेची अडचण सुद्धा आली नाही.यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले.मात्र मागील काही महिन्यात शहरविकासाला विरोध करण्याचा चुकीचा पायंडा पडला जावून न्यायालयात जाऊन शहरविकास थांबविण्यात आला होता. त्यामुळे या ५ नंबर साठवण तलावाच्या बाबतीत राजकारण होऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे. २८ विकासकामांना विरोध होऊन ही कामे लांबल्यामुळे शहरवासियांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे ५ नंबर साठवण तलावाच्या बाबतीत कुणीही आडकाठी आणू नये.शहरातील नागरिकांना नियमितपणे पाणी मिळावे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कोपरगाव नगरपरिषदेला आर्थिक दृष्ट्या खर्च पेलवेल अशा पद्धतीने साठवण तलावाचा आराखडा तयार करण्यात आल्यामुळे वेळ झाला असला तरी पुढील प्रशासकीय मान्यता व लवकरात लवकर निविदा कशा प्रसिद्ध होतील यासाठी पाठपुरावा करणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावा बरोबरच नवीन विस्तारित भागाकरीता रस्ते, गटारी, वीज, छोटे पूल व पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. भुयारी गटारीचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. आठवडे बाजारच्या जागेत सुधारणा करणे, हॉकर्स झोन व पार्किंगची व्यवस्था, म्हाडा अंतर्गत बेघर नागरिकांना स्वत:च्या हक्काची घरे मिळवून देवून शासकीय जागेवर वास्तव्यास असलेल्या लक्ष्मीनगर तसेच शहरातील इतर भागातील नागरिकांना त्यांच्या नावचे उतारे मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाळ, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजी मेहमूद सय्यद, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, दिनार कुदळे, दिनकर खरे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, रमेश गवळी, चंद्रशेखर म्हस्के, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे,असलम शेख, सचिन परदेशी, जावेद शेख, राहुल देवळालीकर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट – संगमनेर बसस्थानकाप्रमाणे कोपरगाव बसस्थानकात व्यापारी संकुल उभारणे आवश्यक होते मात्र ते का उभारले गेले नाही हा संशोधनाचा विषय असून आता या बसस्थानकात व्यापारी संकुल बांधणे शक्य नाही. मात्र बसस्थानकाच्या लगत असलेल्या मोकळ्या जागेत व्यापारी संकुल उभारण्यासाठी शासनाकडून निधी आणू किंवा बीओटी तत्वावर गाळे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- आ.आशुतोष काळे

फोटो ओळ:- पत्रकार परिषदेत पत्रकारांशी वार्तालाप करतांना आ. आशुतोष काळे समवेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी.
