

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद द्वारा आयोजित ‘एक जिल्हा एक हरित विजेता महाविद्यालय’ या स्वच्छता कृती आराखड्यानुसार स्वच्छता रॅकिंगचे पुरस्कार अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते के.जे.सोमैया महाविद्यालयास प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी स्वीकारला. के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे अहमदनगर जिल्ह्यातून पुरस्कार मिळविणारे एकमेव महाविद्यालय आहे.


महाविद्यालय परिसरातील स्वच्छता, स्वच्छतेसाठी केले जाणारे प्रयत्न, जलसंवर्धनासाठी केलेल्या उपाय योजना, घनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा प्रकल्प व त्याचा वापर, हरित संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजना, सांडपाणी व्यवस्थापन या निकषांच्या आधारे के. जे. सोमैया महाविद्यालय जिल्ह्यात अव्वल ठरले आहे.


या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महाविद्यालयाने मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. पुढे ते म्हणाले की, कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये स्वच्छता, आरोग्य संवर्धक वातावरण अत्त्यंत महत्वाचे आहे. यामध्ये महाविदयालयाने केलेल्या भरीव कामगिरिची दखल भारत सरकारने घेऊन महाविद्यलयास हा पुरस्कार प्रदान केला आहे. या प्रसंगी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा अभियानाच्या दिल्ली येथील अधिकारी श्रीमती. जयश्री जानी, हैद्राबाद येथील अधिकारी श्री. साईसुधीर, नागपूर येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. महेश चोपडे हे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव म्हणाले की, महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध समित्या स्थापन करून केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची अंमलबजावणी नियमित केली जाते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिन महाविद्यालयात विविध विभागांमार्फत उपक्रम राबवून साजरे केले जातात. महाविद्यालयातील सांडपाणी प्रक्रिया करून महाविद्यालयाच्या शेजारून वाहणार्या गोदावरी नदीकाठी असलेल्या वृक्षांना दिले जाते. महाविद्यालय व स्थानिक गोदामाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नदी किनारी ‘अंबिका बन’ निर्माण केले आहे. या उपक्रमाचे कौतुक जलतज्ञ श्री. राजेंद्र सिंग यांनी स्वतः कार्यस्थळी येऊन केले होते. पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी महाविद्यालयात ४ लाख लिटर क्षमतेच्या टाक्या उभारल्या आहेत. या पाण्याचा वापर महाविद्यालयातील प्रयोगशाळा, रोपवाटीका व परिसरातील हिरवळ संवर्धनासाठी केला जातो. महाविद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित असून यामुळे महावितरण कडून घेतल्या जाणाऱ्या वीजेत ५०टक्के बचत झाली आहे. महाविद्यालयातील सर्व पथदिवे सौर उर्जेवर कार्यान्वित आहेत. पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन कार्यक्षम पणे केले जाते.
या प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे, सचिव ऍड. संजीव कुलकर्णी सदस्य श्री. संदीप रोहमारे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संतोष पगारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा. विजय ठाणगे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा अभियानाचे महाविद्यालयातील समन्वयक प्रा. डॉ. गणेश चव्हाण यांनी या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी घेत केंद्र सरकारच्या विविध योजना महाविद्यालयात राबविण्यासाठी परिश्रम घेतले. या साठी त्यांना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व कार्यालय अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे व श्री. संजय पाचोरे यांनी काम पाहिले.
