
कोपरगाव प्रतिनिधी:-
विकासासाठी गट-तट विसरून सर्वांनी एकत्र यावे ही संकल्पना आम्ही यापूर्वीच मांडली असून त्याप्रमाणे तालुक्याचेस लोकप्रतिनिधींना एस एस जी एम कॉलेज येथील कोविड सेंटर गुढीपाडवा कार्यक्रम प्रसंगी व राजेश मंटाला यांचे पाणी प्रश्नावरील आंदोलनादरम्यान असे दोनदा आवाहन करून साथ देण्याचे सुतोवाच केले होते. लोकप्रतिनिधींची ही भूमिका देर आए दुरुस्त आए अशीच असून कोपरगाव शहरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे शिर्डी पुढे कोपरगाव अशी २६० कोटी रुपये खर्चाची पाणी योजना मंजूर करून आणून, भले आम्ही त्याचा पाया रचला असेल तर त्यावर त्यांनी कळस चढवून श्रेय घ्यावे, आम्ही त्यांना साथ द्यायला सदैव तयार असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, कोपरगाव शहर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नासह तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तो सुटावा म्हणून तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे युवानेते बिपीन कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यरत आहोत. तालुक्याचे लोकप्रतिनिधीं आणि त्यांच्या विचारांचे शासन राज्यात सत्तारुढ आहे. त्या माध्यमातून त्यांनी काम करायला हवे. ते म्हणतील तिथे आम्ही त्यांना साथ द्यायला तयार आहोत. उलट आम्ही त्यांना एकदा नव्हे तर दोनदा आवाहन केले होते, पण त्यावर त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. काल-परवा डाऊच येथील कार्यक्रमात लोकप्रतिनिधींनीच या भूमिकेला छेद देत गट-तट विसरून विकासासाठी एक व्हा असे आवाहन केले होते. त्यांचे हे आवाहन म्हणजे देर आये दुरुस्त आये असेच आहे. शहराच्या पाण्यासह अन्य प्रश्नावर आपण लोकप्रतिनिधींना सहकार्य करण्याची भूमिका घेऊ भलेही त्याचे श्रेय त्यांनीच घ्यावे असे शेवटी विवेक कोल्हे म्हणाले.
