निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा :- आ. आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव तालुक्यातील वारी गावासह परिसराला पाणी पुरवढा करणारी पाण्याची टाकी गुरुवारी दि. ५ रोजी कोसळली आहे. ही टाकी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सन २०१५-१६ साली तयार करण्यात आली होती. बांधकामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल आणि तांत्रिक चुकांमुळे टाकी मुदतीच्या आत कोसळली असल्याने संबंधित ठेकेदार आणि तत्कालीन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आ. आशुतोष काळे यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, अहिल्यानगर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.

वारी गावाला या टाकीतून नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा केला जात होता. मात्र संबंधित ठेकेदार आणि देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांनी संगनमताने या टाकीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने टाकी कोसळली आहे. या दुर्घटनेमुळे वारी गावाचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
वारी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत २१.५२ कोटी किंमतीची वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणलेली आहे. सदर योजनेचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून योजनेमध्ये वारी गावाकरिता एकूण नविन ३ पाण्याच्या टाक्या नियोजित धरलेल्या आहे. काम पूर्ण झाल्यानंतर निश्चितच गावाचा पाणी प्रश्न मिटणार आहे.

२०१५-१६ झालेल्या या टाकीच्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आ. आशुतोष काळे यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, अहिल्यानगर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *