
कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार कै. के.बी. रोहमारे (दादा) यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन संपन्न झाले. ही स्पर्धा दि. 23 ते 25 जानेवारी 2026 या कालावधीत होत असून या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. आशुतोषदादा काळे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मा. संदिपराव रोहमारे, उपाध्यक्ष मा.सत्येन मुंदडा, मा. सुनिल बोरा, मा. राहुल रोहमारे, मा. सुरेश शिंदे, मा. दिनार कुदळे, मा. निलेश कोते, मा. सुधाकर होन, मा. एस. पी. कुलकर्णी, मा. रविन्द्र पानगव्हाणे, मा. अतुल शिंदे, मा. सागर रोडे, मा. अनूप कातकाडे, मा.अमितेश साबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार मा. आशुतोषदादा काळे यांनी माजी आमदार कै. के. बी. रोहमारे यांच्या कार्याबद्दल गौरउद्गार काढतानाच दादाच्या स्मरणार्थ ही बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केली ही सर्वांसाठी भूषणावह बाब असल्याचे म्हटले.
याप्रसंगी राज्यभरातून आलेले विविध खेळाडू, मार्गदर्शक व क्रिडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन दिवस खेळल्या जाणाऱ्या या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत राज्यभरातून अनेक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेचे प्रायोजकत्व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि. गौतमनगर यांनी घेतले असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.आशुतोषदादा काळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. उद्घाटन सत्र कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मा. संदिपराव रोहमारे यांनी या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची भूमिका विशद केली. स्वागत मनोगतात प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी उपस्थितांचे स्वागत करतांनाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे महाविद्यालय सदैव कटिबद्ध असल्याचे म्हटले तसेच ही बॅडमिंटन स्पर्धा नवखेळाडूंना प्रेरित करणारी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.याप्रसंगी विविध क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळविल्याबद्दल महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे व श्री.साई शेळके यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. एस. के. बनसोडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.सुनील कुटे यांनी केले. या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे यशस्वी आयोजन कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुनील कुटे, क्रिडा शिक्षक मिलिंद कांबळे व सर्व क्रिडाप्रेमी करणार आहेत.
