के. जे. सोमैया महाविद्यालयात के. बी. रोहमारे स्मृति करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- “स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय येथे येत्या ४ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे,” अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे पुढे म्हणाले की, “ही वक्तृत्व स्पर्धा कोपरगावचे माजी आमदार कै. के. बी. रोहमारे यांच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कर्तृत्वाची स्मृति म्हणून तसेच सध्या एक प्रतिष्ठेची वक्तृत्व स्पर्धा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. यंदा या स्पर्धेसाठी ‘मानवतेचे पुजारी : उद्योगरत्न रतन टाटा’, ‘डॉ. मनमोहन सिंह : उदारीकरणाचे प्रणेते’, ‘ईव्हीएम शिवाय निवडणुका शक्य आहेत काय?, ‘विकसित भारतात शेतकऱ्यांचे भवितव्य’, ‘मराठी भाषा : अभिजात आणि लोकप्रिय’ असे ज्वलंत विषय ठेवण्यात आलेले आहेत.”
“या स्पर्धेचे उद्घाटन ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सुप्रसिद्ध कवी आणि लेखक प्रा. डॉ. संतोष पवार यांच्या शुभहस्ते आणि कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. स्पर्धकांच्या निवास आणि भोजनाची मोफत व्यवस्था केलेली आहे तसेच राज्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे” असे आवाहन या स्पर्धेचे संयोजक डॉ. जिभाऊ मोरे व सहसंयोजक डॉ. रवींद्र जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *