
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील मारुतीराव तिडके पाटील विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी विद्यार्थ्यांना चमत्काराचे प्रयोग करून दाखवत त्यामागील विज्ञान अथवा हातचलाखी समजावून सांगितली. श्रद्धा व उपासनेचा आधिकार संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकास दिला आहे. त्यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार करण्याचे कर्तव्य सांगितले आहे.त्यामुळे श्रद्धा जरुर ठेवावी परंतु अंधश्रद्धेपासून सर्वानी दुर रहावे, असे प्रतिपादन कृष्णा चांदगुडे यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन अनोख्या पद्धतीने पाण्याने दीपप्रज्वलन करून झाले. काही भोंदुबाबा चमत्कार करून भक्तांना कसे फसवतात त्याचे प्रयोग दाखविण्यात आले. नारळातुन करणी काढणे, जळता कापुर खाणे, कलशातुन अखंड तिर्थ काढणे, अंगात येणे,त्रिशुल जिभेतुन आरपार बाहेर काढणे,लिंबातुन भानामती काढणे, रिकाम्या हातातुन अंगारा काढणे आदी चमत्कार करून दाखवण्यात आले.त्याची उकल पण करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या मनातील अंधश्रद्धेबाबतच्या शंकांचे निरसन चांदगुडे यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापक ए.आर.मांडवडे,पर्यवेक्षक पी.आर.चंदने, आय.ए.के.मोमीन ,आर.के मोरे , पी.बी .घोलप, श्रीमती एम जे.गावित , श्री.जाधव सर, कु.सोनवणे मॅडम, श्रीमती व्ही.ए शिळकंदे व इतर सेवक हजर होते.
