
कोपरगांव प्रतिनिधी:-
सध्या देशासह संपूर्ण राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातलेले असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून आरोग्य विभागाच्या व प्रशासनाच्या माध्यमातून या आजाराला रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहे मात्र या आजाराचा धोका प्रमाणापेक्षा अधिकच वाढत असल्याने आवश्यक वैद्यकीय साधन सामुग्रीचा अभाव,रेमडेसीवीर इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा,बेडची कमतरता यामुळे रुग्णांना ऐनवेळी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी हलविण्यास येणा-या अडचणींचा विचार करुन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने जिह्यातील ग्रामीण रुग्णालयांसाठी बायपॅप मशीन तसेच रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केली.
विवेक कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसापासून अहमदनगर जिह्यातही कोरोना संसर्गाने थैमान घातले असून या आजाराचा सामना करण्यासाठी अपुरी साधन सामुग्री,औषधांचा तुटवडा, हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसणे, ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा नसणे या विविध कारणांमुळे रुग्णांचे तसेच त्यांचे नातेवाईकांचे प्रचंड हाल होत असून या संसर्गाला रोखण्यासाठी शासकीय यंत्रणेसह विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून आपापल्या परीने प्रयत्न होत आहे मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे.अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही आशिया खंडातील अग्रगण्य बँक असून सातत्याने सामाजिक उपक्रमात नेहमीच सहभागी असते या वैश्विक महामारीच्या काळात बँकेचेही योगदान गरजेचे असून जिल्हा बँकेने अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये बायपॅप मशीन तसेच रुग्णवाहिका उपलब्ध करुन कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करावा या मागणीचे निवेदन उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांना देण्यात आले.यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे उपस्थित होते.
