
कोपरगांव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन विषयक नवनवीन योजना व धोरणांच्या अंमलबजावणीसाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस कार्यवाही करुन ती धोरणे व योजना दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा पशुसंवर्धन विभागाचा प्रयत्न राहील असे आश्वासन राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांनी दिले.

गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक स्व. नामदेवराव परजणे पाटील यांच्या १९ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संघाच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या दूध उत्पादकांच्या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ. वसेकर बोलत होते. प्रारंभी स्व. नामदेवराव परजणे पाटील यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन प्रतिमेस पुषांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. संघाचे चेअरमन राजेश परजणे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शितलकुमार मुकणे, बायफ संस्थेचे राज्य विभागीय संचालक व्ही. बी. दयासा, अहमदनगर पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. सुनिल तुंबारे, बायफ संस्थेचे पशुपोषण व पशुआहार विभागाचे प्रमुख डॉ. मनोजकुमार आवारे, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे डॉ. राजवळ, आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी संघाचे चेअरमन राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
पशुपालन व दुग्धव्यवसायात कार्यरत असलेल्या राज्यभरातील पशुपालक व दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ' उत्कृष्ठ पशुपालक राज्यस्तरीय पुरस्कार ' लवकरच सुरु करण्यात येणार असून त्यामाध्यमातून दुग्धव्यवसाय वाढीसाठी चांगला हातभार लागणार असल्याचे सांगून डॉ. वसेकर पुढे म्हणाले, कोपरगांव परिसरात स्व. नामदेवराव परजणे पाटील यांनी सुरु केलेला दुग्धव्यवसाय राज्यातील इतर दूध संघांना दिशादर्शक आहे. भगिरथ प्रयत्नातून त्यांनी दुधाची गंगा शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहविण्याचे काम केले. गोदावरी दूध संघाने भारतीय उद्योग प्रतिष्ठान तसेच राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड या समांतर व्यवस्था असलेल्या संस्थांमार्फत वेगवेगळया योजना व उपक्रम राबवून दुग्धव्यवसायाला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिलेली आहे. सॉर्टेडसिमेनसाखा भारतात सर्वप्रथम उपक्रम राबविणारा गोदावरी दूध संघ एकमेव आहे. हा उपक्रम राबवून संघाने दुग्धव्यवसायात मोठी क्रांती केली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत भविष्यात गायीच्या शेणापासून वेगवेगळे प्रकल्प राबविण्याचा आमचा मानस आहे.
डॉ. शितलकुमार मुकणे यांनी आपल्या भाषणातून पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती दिली. विविध कारणांमुळे शेती व्यवसायात काहिशी अस्थिरता असली, तरीसुध्दा हमखास उत्पन्न मिळवून देण्याची किमया पशुसंवर्धनाच्या व्यवसायात आहे. अर्थकारणाच्या जडणघडणीत पशुसंवर्धनाचा वाटा दुर्लक्षित करण्यासारखा नाही. योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून सहकार्य मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकातून राजेश परजणे पाटील यांनी संघाने कार्यक्षेत्रात भारतीय उद्योग प्रतिष्ठानच्या सहकार्याने सुमारे ४० केंद्रांमार्फत कृत्रिमरेतन गर्भधारणा कार्यक्रम राबवून जातीवंत गायींची पैदास केली. बायफ संस्थेच्या सहकार्याने पशुसंवादिनीच्या माध्यमातून दूध उत्पादकांना कृत्रिमरेतन, रॉर्टेडसिमेन, खनिज मिश्रण, पशुखाद्य, जनावरांचे आजार, लसीकरण याबाबत दररोज माहिती देण्यात येते. त्याचा दूध उत्पादकांना चांगला फायदा झालेला आहे. सन २०१८ ते २०२३ या पाच वर्षाच्या कालावधीत कार्यक्षेत्रातील २ लाख ६३ हजार १७ गायींवर पारंपारीक कृत्रिम रेतन करण्यात आलेले असून १ लाख ३२ हजार ९६२ गायींना गर्भधारणा होऊन सुमारे ४७ हजार ५६५ कालवडी जन्माला आलेल्या आहेत. तसेच सन २०१६ ते २०२३ या कालावधीत २६ हजार, ८१९ सॉर्टडसिमेनचे रेतन करण्यात आलेले असून त्यापैकी १४ हजार ३१३ गायींना गर्भधारणा होऊन ११ हजार ८६३ कालवडी व ९७१ गोन्हे जन्माला आलेले आहेत. याशिवाय संघाने कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना विविध बँकांच्या माध्यमातून गाई खरेदी व गोठ्यासाठी कर्जपुरवठा
उपलब्ध करुन दिलेला आहे. अनुदान तत्वावर बायोगॅस प्रकल्प उपलब्ध करुन दिलेले आहेत. हे कामकाज करीत असताना संघाला अनेकवेळा तोटा सहन करावा लागतो. परंतु दूध उत्पादकांचे हीत समोर ठेऊन व जनावरांचे आरोगय विचारात घेऊन दुग्ध व्यवसायाला अधिक प्राधान्य दिले असल्याचेही श्री परजणे पाटील यांनी सांगितले.
यावेळी डॉ. मनोजकुमार आवारे यांनीही दूध उत्पादकांना मार्गदर्शन केले. सन २०२२-२३ या सालात संघाला सर्वाधिक दुधाचा पुरवठा करणाऱ्या दूध संस्थांचे चालक लक्ष्मणराव शिंदे, उत्तमराव डांगे, सेंटर चालक नवनाथ गवांदे, सुखदेव भंडारे, चिलींग सेंटर चालक योगेश निमसे, रवींद्र मुखेकर, दत्तप्रसाद मुंदडा, दुधाला सर्वाधिक दर देणाऱ्या संस्थांचे चालक अशोक नळे, सुदाम शिंदे, सेंटर चालक गोकूळ कुंजीर, राजेंद्र खर्डे, दुधाचा नाश न होऊ देणाऱ्या संस्थांचे चालक अशोक निकम, नानासाहेब गवळी, सेंटर चालक रामनाथ गवळी, शरद जाधव, संघाच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक पारंपारिक कृत्रिमरेतन करणारे रेतनतज्ज्ञ नवनाथ कवडे, बाळासाहेब कोल्हे, नामदेव गवारे तर सॉर्टेडसिमेनचे सर्वाधिक कृत्रिम रेतन करणारे रेतनतज्ज्ञ भाऊसाहेब जाधव, गौरव जाधव, जालिंदर साबळे यांचा पाहुण्यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. चर्चासत्रासाठी दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी केले तर माजी संचालक उत्तमराव माने यांनी आभार व्यक्त केले.
