
कोपरगाव प्रतिनिधी:-
जगण्यासाठी श्वासाची आपल्याला जितकी नितांत गरज असते तितकीच गरज आयुष्य घडविण्यासाठी जिद्द, आत्मविश्वास आणि प्रयत्नांची असावी लागते, तरच माणसाचे जगणे देखणे होते असे उद्गार कवयित्री व पत्रकार कु. कोमल पोळ यानी संवत्सर येथील कार्यक्रमात काढले.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या १९ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित प्रवचनातून ' देखणे ते जगणे ' या विषयावर कु. कोमल पोळ बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील या अध्यक्षस्थानी होत्या. तर व्यासपीठावर विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे संत निजानंद महाराज, ज्येष्ठ संत विवेकानंद महाराज, संत चंद्रानंद महाराज, संत राजानंद महाराज, संत प्रेमानंद महाराज तसेच माजी जिल्हा कृषी अधिक्षक पंडीतराव वाघिरे, संगमनेर विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, अहमदनगरचे नायब तहसीलदार विक्रम पवार, कोपरगांव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कोपरगांव आत्मा विभागाचे अविनाश निर्मळ यांची उपस्थिती होती. प्रारंभी स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले. संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय, कोपरगाव येथील महिला महाविद्यालयालयातील गुणवंत विद्यार्थी - विद्यार्थीनींना शिष्यवृत्तीचे धनादेश यावेळी वितरीत करण्यात आले.

आपला चेहरा देखणा बनविण्यासाठी आपण आयुष्यभर राबत असतो. परंतु आयुष्य देखणं बनविण्यासाठी कोणतीही काळजी आपण घेत नाही. खरंतर देखणा केलेला चेहरा काही कालावधीपर्यंतचं टिकतो, मात्र देखणं केलेलं आयुष्य आपल्या हयातीनंतरही शाश्वत राहतं आणि ते अनेक पिढ्यांना आदर्श देऊन जातं. अनेक महान विभूतींनी आपल्या कर्तृत्वातून सिध्द केलेल्या देखणेपणाचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवायला हवा असे सांगून कु. कोमल पोळ पुढे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, थोर समाजसेविका मदर तेरेसा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अशा थोर पुरुषांनी आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून जगणं सुंदर कसं असतं याची व्याख्या समजावून सांगितली. या महान पुरुषांनी दाखविलेल्या वाटेवरून चाललं पाहिजे. त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. तेव्हाच आपलं जीवन खऱ्या अर्थाने देखणं होईल.
आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी आपण लढायला हवं. पहिल्यांदा आपले विचार स्वच्छ करायला हवेत. आपल्या मनाला सक्षम बनवायला हवं. तेव्हा कुठे आपण खऱ्या अर्थाने एक देखणं आयुष्य स्वतः साठी निर्माण करू शकू. त्यासाठी प्रत्येकान पुस्तकांत जी जीवनमूल्ये आहेत, जी विचारधारा आहे ती आपल्या मेंदूमध्ये रुजवावीत तरच आयुष्य देखणे होईल. तुम्ही कितीही हुशार असाल, प्रतिभावंत असाल, श्रीमंत असाल परंतु माणसाशी कसं वागायचं? याची जर तुम्हाला जाणीव नसेल तर तुम्ही खूप दरिद्री आहात असं दारिद्र्य जर तुम्हाला दूर करायचं असेल तर माणसांशी माणुसकीने वागणे या विचारांची आज गरज आहे आणि असे विचार तुम्हाला एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सिध्द करुन जातात, देखणं जीवन जगण्यासाठी आपण आपल्या इतिहासातून धडे घेऊन वर्तमानात त्याची रुजवणूक करून आपल्या आयुष्याला एका उंचीवर नेऊ शकतो त्यासाठी सतत प्रयत्नवादी असणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.
सौ. शालिनीताई विखे पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा आदर्श आजच्या मुलींनी घ्यावा व अन्याय, अत्याचाराविरुध्द लढा देण्यासाठी सक्षम रहावे असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी- विद्यार्थीनी व ग्रामस्थ उपस्थित होते.
