स्पर्धा परीक्षा केंद्र के. जे. सोमैया महाविद्यालय व आत्मा मालिक करियर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यान…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
“नियमित अभ्यास करणारे विद्यार्थीच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतात. प्रामाणिकपणे पाठांतर करणे, शब्दकोश वाढवणे, चिंतन-मनन याबरोबरच आपल्यातील क्षमतेवर विश्वास असणारेच अधिकारी होऊ शकतात.” असे प्रतिपादन जिल्हा वन अधिकारी मा. विशाल माळी यांनी येथे केले. स्पर्धा परीक्षा केंद्र के. जे. सोमैया महाविद्यालय व आत्मा मालिक करियर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यान सत्रात श्री. माळी बोलत होते.
आत्मा मालिक करिअर अकॅडमीचे संचालक मा. पंकज माळी म्हणाले की, “आपल्याला एम.पी.एस.सी. किंवा यूपी.एस.सी. का करायचं हे समजून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी दररोज अभ्यास करण्याचा संकल्प करून तो तडीस नेल्यास ते नक्की अधिकारी होऊ शकतात. उच्च अधिकाऱ्यांची सर्व पदे ही सेवेसाठी आहेत. जर आपल्याला अधिकारी व्हायचं असेल तर आपल्यामध्ये सेवावृत्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण अधिकारी झाल्यानंतर येथील शासन व्यवस्थेचा भाग होणार आहोत, त्यामुळे आपल्याला सर्वसमावेशक ज्ञान देखील असावं आणि ते नियमित अभ्यासानेच शक्य होते.”
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे म्हणाले की, “आपले महाविद्यालय आणि आत्मा मालिक करिअर अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने सुरू होत असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी घेऊन या संधीचा लाभ घ्यावा. एम.पी.एस.सी. आणि यूपी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी. तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल. तुमच्या यशाबरोबरच महाविद्यालयाचाही नावलौकिक वाढेल. “
महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. सुरेश शिंदे म्हणाले की, “स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्यासाठी अभ्यासाबरोबरच दृढ संकल्प देखील आवश्यक आहे. कठोर परिश्रमाने दृढ संकल्प सिद्धी जातात.”
याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक इतिहासावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी पारंपारिक नोकऱ्यांबरोबरच स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन अहोरात्र मेहनत करण्याची तयारी ठेवण्याचेही आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख डॉ. वसुदेव साळुंखे यांनी केले तर सदस्य डॉ. रवींद्र जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *