
कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यासह, मतदारसंघातील शेतक-यांचा कृषी पंपाचा विज पुरवठा खंडीत करण्याची मोेहीम वीज वितरण कंपनीने सुरु केल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असुन अगोदरच विविध संकटात सापडलेल्या शेतक-यांनी कठोर पाउले उचलले तर त्यास राज्य सरकार जबाबदार राहील त्यामुळे वितरण कंपनीने सदरची मोहिम त्वरीत थांबवून वीजप्रवाह सुरळीत करावा अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारू असा इशारा कोपरगाव औदयोगिक वसाहतीचे चेअरमन, युवा नेते, जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी दिला आहे.
कोरोना विषाणुमुळे देशासह राज्यभरात लाॅकडाउन करण्यात आले होते. या कालावधीत अर्थव्यवस्था ठप्प झालेली होती. छोटया मोठया व्यावसायिकांसह शेतक-यांनाही मोठया प्रमाणात आर्थीक फटका बसला. लाॅकडाउन, अतिवृष्टी या समस्यांनी जर्जर झालेल्या बळीराजाची रब्बी पिकांमुळे आर्थीक विवंचना कमी होईल असे वाटत असतांनाच महावितरणने वीज पुरवठा खंडीत करण्याच्या सुरू केलेल्या धोरणामुळे ही पिकेही हातची जाउन मोठा आर्थीक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
वास्तविक राज्य सरकारने सत्तेवर येताच वीज बीलांसह कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचप्रमाणे 100 युनीट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु याकडे दुर्लक्ष करून वीज प्रवाह तोडण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचे श्री कोल्हे म्हणाले. कोरोना, लाॅकडाउन, नैसर्गिक आपत्ती अशा विविध बाजुने घेरल्या गेलेल्या शेतक-यांची पदरी गेल्या वर्षीही निराशा आली. खरीपाचे पिके वाया गेल्याने ते उभे करण्यासाठी घेतलेले कर्जही फिटले नाही. रब्बीच्या मोसमात विहीरीमध्ये पाणी साठा असतांना वीजप्रवाह खंडीत करीत असल्याने संकटात आणखी भर पडली आहे. त्यामुळे शेतक-यांपुढे आणखी मोठे संकट उभे राहिले आहे. या संकटातून शेतक-यांना सावरण्याऐवजी हे सरकार संकटात लोटण्याचे पाप करीत आहे. त्यामुळे शेतक-यांना न्याय देण्याच्या भुमिकेतून वीजप्रवाह खंडीत करणे थांबवून,वीज प्रवाह सुरळीत करावा,अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा श्री कोल्हे यांनी दिला.
