
कोपरगाव प्रतिनिधी:-
संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक सहकार रत्न, माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या समाजोपयोगी कामाच्या शिकवणीचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेऊन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामुदायक विवाह सोहळा आयोजित करण्याची परंपरा सुरू केली होती मात्र कोरोनाच्या नियमांमुळे गेले दोन वर्षे त्यात खंड पडला होता, परंतु अलीकडेच शासनाने सर्व निर्बंध शिथिल केल्याने संजीवनी युवा प्रतिष्ठान तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्यावतीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघात सामुदायक विवाह सोहळा चालू वर्षी सन २०२२ मध्ये आयोजित केला जाणार असून इच्छुक वधू-वर आप्तेष्ट यांनी प्रत्यक्ष भेटून अथवा भ्रमणध्वनी क्रमांक ७७२१०९२१२१ यावर नोंदणी करावी असे आवाहन युवानेते, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे तसेच संजीवनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोपरगाव मतदार विधानसभा संघाबरोबर परिसरातील गरजवंत व अडचणीतील नागरिकांना सामाजिक जाणिवेच्या भावनेतून सतत जनहिताची कामे करत आहोत, तसेच पूरग्रस्तांना मदत,वृक्षारोपण, मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया, सर्व रोग तपासणी शिबीर, दहीहंडी उत्सव,गडकिल्ले स्वच्छता मोहीम,कोविड सेंटर,कोरोना रूग्णांना मोफत उपचारासह भोजन व तत्सम व्यवस्था, आदिवासी, दिन दलित मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, बहुजनांच्या प्रत्येक संकटात मदत, दुष्काळात तसेच टंचाई काळात शहरवासीयांना व मतदार संघातील शेतकऱ्यांकडे असलेले पशुधन जगविण्यासाठी टँकरद्वारे मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन सहकार्य, विविध क्रीडा स्पर्धांसाठी सहकार्य, तालुका जिल्हा व राज्यस्तरावरील व्यक्तिगत क्रीडा प्रकारात खेळाडूंना सहकार्य तसेच स्पर्धात्मक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व सर्व प्रकारचे सहकार्य, गारपीटग्रस्तांसाठी मदतीचे पाऊल, खरीप व रब्बी तसेच महापूर आपत्तीत नुकसान झालेल्या पिकांना सर्वाधिक पिक विमा मिळवून देणे, एक राखी जवानांसाठी, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रमांतर्गत बंधारे दगडी साठवण तलाव शेततळी बांधून त्यातून शेतकऱ्यांना मदत, विविध नैसर्गिक आपत्तीत व्यवस्थापनासह तात्काळ मदत करून सन २०१८ व २०१९ मध्ये सर्वधर्मीय सामुदायक विवाह सोहळा थाटात साजरा करत शेकडो कुटूंबांच्या आनंदाचा व निराधारांना सतत पाठबळ देण्यात संजीवनी युवा प्रतिष्ठानने आजवर मोलाची भूमिका पार पाडलेली आहे. आता कोरोना प्रभाव कमी झाल्यामुळे पुन्हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. गरीब-श्रीमंत अथवा जाती धर्माची आडकाठी न ठेवता सर्वांसाठी माणूसकीचे केंद्र असणाऱ्या या विवाह सोहळ्यात इच्छुकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व त्या बाबतची नावं नोंदणी करावी असे आवाहन विवेक कोल्हे यांनी शेवटी केले आहे.
