
कोपरगाव प्रतिनिधी:- सर्वसामान्यांच्या नावावर खोटी वीज बिलं टाकून, पठाणी वसुली करताना वाढीव वीज बिलांवर जनतेला अंधारात लोटणा-या राज्य सरकारची ही मिजासखोरी असल्याची घणाघाती टीका माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केली. सौ कोल्हे म्हणाल्या, वाढीव वीज बिल हा सरकारचा विषय आहे, असं वक्तव्य राज्याचे उर्जा मंत्री यांनी केला आहे, यावरुन राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत हे राज्य सरकारचे मंत्री नाहीत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. लॉकडाऊन काळात सर्वांना अन्यायकारक वीज बील दिल्यानंतरही, सरकारचे उर्जा मंत्री नितिन राऊत असं वक्तव्य कसं करु शकतात? असा सवालही त्यांनी केला. सौ कोल्हे म्हणाल्या, कोरोना काळात लोकांना वीज बिल माफ करण्याचे गाजर दाखवून सरकारने लोकांच्या तोंडाला अक्षरशा पाने पुसली, विज बिल माफ करणे तर सोडाच परंतु वाढीव वीज देऊन सरकारने सर्वसामान्यांचे खिसे कापले आहेत. ही फसवणूक आहे, सर्वसामान्यांचा वीज बिलाच्या नावाने हा छळ आहे, असा आरोपही त्यांनी केला. लॉकडाऊन काळात वीजेचं मीटर रिडिंग घेता आलं नाही, जे अंदाजाने दिलं गेलं, तो अंदाज आता सुधारता येणार आहे. कारण लॉकडाऊन लागण्याआधी काय मीटर रिडिंग होतं आणि आता काय आहे, यावरुन वीजेचा वापर समजू शकतो,तरी वाढीव आणि अन्यायकारक वीज बिल सर्वसामान्य जनतेवर किती दिवस सरकार लादणार आहे. असा परखड सवाल करून पुन्हा पुन्हा वीज बिलाच्या मुद्द्यावर सर्वसामान्यांना वेठीस धरणारे , हे सरकार भूमिका बदलताना दिसत नाही.तेंव्हा ही पठाणी वसुली ताबडतोब थांबवून लोकांना अंधारात लोटण्याची भूमिका घेऊ नये त्या ऐवजी वाढीव बिलात ५० टक्के सूट देवून उर्वरित ५० टक्के बिले बिलांचे हप्ते पाडून द्यावेत अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
