किशोरचा आदर्श घेऊन राहुरी तालुक्यातील अनेक तरुण कोरोना विधवा विवाहास तयार:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
राहुरी तालुक्यातील चार तरुणांनी कोरोना एकल (विधवा) महिलांच्या सोबत विवाह करण्यास सहमती दाखविली असल्याचे महाराष्ट्र राज्य एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका समन्वयक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ‘ कोरोना एकल पुनर्वसन समितीचे’ तालुका समन्वयक अप्पासाहेब ढूस यांचा पुतण्या व राजेंद्र तथा विजय दगडू ढुस यांचा मुलगा किशोर राजेंद्र ढुस यांने वैशाली नामक एका कोरोना विधवेशी विवाह केला. तिला ९ महिन्याचे बाळ असूनही किशोरने त्या बाळासह तिचा स्वीकार केला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालिताई चाकणकर, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकून आदींनी किशोरचे अभिनंदन केले असून राज्याने या आदर्श विवाहाची दखल घेतली आहे.
त्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आप्पासाहेब ढुस बोलत होते.
किशोर ढुस यांनी केलेला कोरोना विधवा विवाह हा राज्यातील पहिला कोरोना विधवा विवाह ठरला असून त्यामुळे तरुणाई मध्ये एक सकारात्मक संदेश गेला आहे. अनेक तरुणांनी त्यापासून प्रेरणा घेतली आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून राहुरी तालुक्यातील चार तरुणांनी कोरोना विधवा महिलांसोबत विवाह करणेस व त्यांना जीवनभर आधार देऊन त्यांचे पुनर्वसन करणेस सहमती दर्शविली असल्याचे ढुस यांनी सांगितले.
पुढे बोलताना ढुस म्हणाले की, राज्यात कोरोनात ७० हजार महिला विधवा झाल्या असून त्यात ५० वर्षापेक्षा कमी वयाच्या २० हजार महिला आहेत. या महिलांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्यातील सर्व कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून यातील तरुण वयाच्या महिलांचे विवाह होण्यासाठी मदत करणे..,
महाराष्ट्रात विधवा विवाहाला खूप मोठी परंपरा आहे परंतु अलीकडच्या काळात जाती बळकट होताना, परंपरा, वाढती पुरुषप्रधानता यामुळे विधवा विवाहाची गती मंदावली आहे..
आम्ही ‘करोना एकल पुनर्वसन समिती’च्या माध्यमातून अशोक कुटे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर अशा विधवा महिलांना विवाह करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत असे यावेळी बोलताना आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, हेरंब कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या माध्यमातून आम्ही एक वेबसाइट सुरू करून त्यात असे विवाह करणाऱ्या महिला व पुरुष यांच्या नोंदणीची व्यासपीठ तयार करतो आहोत. जेणेकरून महाराष्ट्रातील विधवा महिलांनी विवाह केले पाहिजेत व तरुणांनीही आवर्जून जोडीदार निवडताना अश्या एका महिलेचे आयुष्य सुखी करण्याचा व तिला मानसिक आधार देणेचा विचार करावा हा त्यामागे हेतू आहे. पंडिता रमाबाई यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे या वर्षात आपण पंडिता रमाबाई यांना आदरांजली म्हणून विधवा विवाहाची चळवळ गतीमान करूयात.
सहारा कोविड सेंटर च्या माध्यमातून आणि देवळाली हेल्प टीमच्या मदतीने साडे पाचशे कोविड रुग्णांना आम्ही मोफत सेवा देऊ शकलो, रुग्णांना ज्या कोविड सेंटरने अतिरिक्त बिले आकारल्याने रुग्णांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता त्या तुलनेत मोफत उपचार मिळलेने रुग्णांची कित्येक कोटींची बचत करू शकलो, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या व महिला बाल विकास विभागाचे मदतीने कोरोनाने पालकांचे छत्र गमावलेल्या तालुक्यातील १८५ बालकांना बाल संगोपन योजना आम्ही लागू करणेत आम्हाला यश आले आहे. आता कोरोनाने विधवा झालेल्या भगिनींचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन करायचे असेल तर त्यांना कायमचा आधार / जीवनसाथी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यासाठी किशोर च्या रूपाने सुरुवात आम्ही आमच्या घरापासून करीत आहोत. त्यास आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज असून आपल्या आजूबाजूला जे कुणी कोरोना विधवा आणि विदुर झाले आहेत व त्यांना विवाह करण्याची इच्छा असेल तर त्यांनी कृपया संपर्क साधावा असे आवाहन ढुस यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *