कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- जीवघेण्या कोरोना आजारापासून आपला बचाव व्हावा यासाठी १८ वर्ष वयाच्या पुढील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांनी देखील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत पुढाकार घ्यावा. माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सवात महिलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जात असून सर्व महिलांनी लसीकरणासाठी पुढाकार घेवून आपले कुटुंब सुरक्षित ठेवावे असे आवाहन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी महिला भगिनींना केले आहे.
कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी ‘जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सव साजरा करण्यात येत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सण-उत्सव साजरे करण्यास बंदी होती. मात्र यावर्षी निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे इतर कार्यक्रमांबरोबरच महिलांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी घटस्थापनेपासून महिलांचे कोरोना लसीकरण करण्यात येत असून नऊ दिवस महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्याबद्ल अधिक माहिती देतांना सौ. पुष्पाताई काळे यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ‘जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सवास महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नवरात्र सणावर जरी कोरोनाचे सावट असले तरी सर्व प्रकारच्या उपाययोजना करून व योग्य खबरदारी घेवून महिला नवरात्र उत्सवामध्ये सहभागी होत आहे. महिलांसाठी नवरात्रीचे नऊ दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे.लस एकदम सुरक्षित आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी देशाप्रती आपले कर्तव्य समजून प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने खास महिलांसाठी लसीकरण मोहीम हाती घेतली असून महिलांबरोबर पुरुष देखील लसीकरण करून घेत आहे हि अतिशय समाधानाची बाब असून तीन दिवसात जवळपास ३५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती सौ. पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.


फोटो ओळ:- कोपरगाव येथे ‘जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सवामध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतांना महिला.
