कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील गौतम सहकारी बँकेने आजवर आपल्या उत्कृष्ठ कामगिरीच्या बळावर अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार पटकाविले असून बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँको संस्थेच्या वतीने देण्यात येणारा देश पातळीवरील “उत्कृष्ट टेक्नॉलॉजी पुरस्कार” नुकताच कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे म्हैसूरचे विद्यमान खासदार प्रताप सिम्हा यांच्या हस्ते गौतम सहकारी बँकेला प्रदान करण्यात आला असून आ. आशुतोष काळे यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत हा पुरस्कार स्वीकारला आहे.
उत्कृष्ट टेक्नॉलॉजी पुरस्कारासाठी देशभरातील अनेक नागरी बँकांची आर्थिक निकषावर पाहणी करण्यात आली होती. यामध्ये ग्रामीण भागातील बँकेची आर्थिक परिस्थिती, आधुनिक डिजिटल बँकींग माहिती व तत्रंज्ञान, बँकेच्या ठेवी, वसुलीची पध्दती, तसेच सभासद, कर्जदार यांचे हिताचे संरक्षण आदी बाबींचे “बँको”च्यावतीने परीक्षण करण्यात आले होते. यामध्ये गौतम सहकारी बँक सर्व निकषांवर सरस ठरत उत्तम कारभार करत असल्यामुळे या पुरस्कारासाठी बँकेची निवड यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. मात्र कोवीड १९ मुळे सदर पुरस्कार प्रदान कार्यक्रम झालेला नव्हता. हा कार्यक्रम बुधवार (दि.०१) रोजी म्हैसूर येथे संपन्न झाला असून गौतम बँकेस स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.आमदार आशुतोष काळे यांनी बँकेच्या वतीने या पुरस्काराचा स्विकार केला. याप्रसंगी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, व्हा.चेअरमन धोंडीराम वक्ते,संचालक, अनिल महाले, नानासाहेब रोहम, अँड सुनिल शिलेदार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमूड, संगणक इनचार्ज उमेश ढगे हजर होते.
माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांनी साखर कारखान्याची उभारणी करून कोपरगाव तालुक्याचा कायापालट करून ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी अनेक सहकारी संस्था स्थापन केल्या असून त्यापैकी एक सहकारी संस्था म्हणून गौतम बँकेचे नाव अग्रभागी आहे. अर्थकारणाला गती देण्यामध्ये गौतम सहकारी नागरी बँक महत्वाची भूमिका पार पाडत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. बाजारपेठेला चालना मिळत आहे. आजरोजी बँकेच्या ठेवी १०० कोटीच्या पुढे गेल्या आहेत. रिझर्व बँकेच्या सर्वच नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे बँकेला मिळत असलेले पुरस्कार अभिनंदनिय असल्याचे बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांनी म्हटले असून त्यांनी बँकेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

फोटो ओळ – खासदार प्रताप सिम्हा यांच्या हस्ते “उत्कृष्ट टेक्नॉलॉजी पुरस्कार” स्विकारतांना आमदार आशुतोष काळे समवेत बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, व्हा.चेअरमन धोंडीराम वक्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमूड आदी.
