
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशनला बदली झाली होती मात्र त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर कोरोना नियंत्रणासाठी तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल पोलीस प्रशासनाने घेत त्यांची नाशिक येथे झालेली बदली रद्द करत त्यांना पुन्हा कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून मुदतवाढ दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कठोर निर्णय घेतले. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सहा महिन्यातच अनेक गुन्हेगारांना जेरबंद केले होते. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी कोपरगाव तालुक्यात काम केले आहे. त्यांची बदली झाल्याचे वृत्त काही दिवसापूर्वी प्रसारित झाले होते. कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण जनतेसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींनीही त्यांची भेट घेत झालेली बदली रद्द करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे मागणी केली होती. अखेर पोलिस प्रशासनानेही पोलीस निरीक्षक जाधव यांना मुदतवाढ दिली आहे. दौलतराव जाधव यांना मिळालेल्या मुदत वाढीचे कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण जनतेने अभिनंदन केले आहे.
