राष्ट्रसंत जनार्दनस्वामी ट्रस्टवर रमेशगिरी महाराजांच्या नियुक्तीसाठी भक्तगणांचा आक्रमक पवित्रा..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजआश्रम ट्रस्ट मंडळावर संत जनार्दन स्वामी महाराजांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे शिष्य रमेशगिरी महाराज यांना मानणारा मोठा भक्त वर्ग असून आश्रम ट्रस्टची प्रगती व भक्त गणांचा राबता त्यांच्याचमुळे आश्रमात आहे. मात्र आश्रमाच्या विश्वस्तांमध्ये रमेश गिरी महाराज यानां स्थान नाही . त्यामुळे आश्रमाच्या रिक्त झालेल्या विश्वस्तांच्या जागी रमेशगिरी महाराज यांची नियुक्ती करण्याची मागणी भक्तगणांनी केली आहे. रमेशगिरी महाराजांची विश्वस्तमंडळावर नियुक्ती न केल्यास आश्रमाच्या धान्य फेरी व इतर उपक्रमांवर बहिष्कार घालण्याचा इशारा देत भक्तगणांनी विश्वस्त मंडळाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे.
येथील संत जनार्दन स्वामी आश्रम मंडळातील विश्वस्त बाबुराव पाटील यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असून त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नवीन विश्वस्त निवडीसाठी विश्वस्त मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये रिक्त जागेसाठी ट्रस्टकडे अनेक जणांचे अर्ज आले होते. मात्र रमेशगिरी महाराज यांचे नाव टाळून त्या रिक्त जागेवर मयत पाटील यांच्याच वारसाचे नाव नक्की करण्यात आल्याचे समजते , हजारो-लाखो भाविकांचे श्रद्धास्थान पूजनीय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्यानंतर भक्तांसाठी वंदनीय असलेल्या रमेशगिरी महाराज यांच्या नावाचा विश्वस्त मंडळाला तिटकारा का असा सवाल भक्तांनी यावेळी उपस्थित केला आहे. रमेशगिरी महाराज यांची ट्रस्टवर विश्वस्त म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी भक्त वर्गातून मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. प. पु. जनार्दन स्वामी महाराजांच्या निर्वाणानंतर येथे रमेशगिरी महाराजांचे वास्तव्य बऱ्याच वर्षापासून असून आज त्यांच्या श्रद्धेपोटी अनेक भाविक या आश्रमाला वस्तू आर्थिक स्वरूपात तसेच धान्य फेरीच्या माध्यमातून शेकडो क्विंटल धान्य दान म्हणून देतात . ते केवळ रमेशगिरी महाराज यांच्या श्रद्धेपोटीच. त्यामुळे सध्याच्या जनार्दन स्वामी विश्वस्त मंडळ व त्यांच्या अध्यक्षांनी भक्त मंडळाने केलेल्या मागणीचा आदर करून रमेशगिरी महाराज यांची या मंडळावर विश्वस्त म्हणून नियुक्ती करावी अन्यथा संपूर्ण भक्तमंडळी विश्वस्त मंडळाच्या विरोधात जाईल तसेच विश्वस्त मंडळ व आश्रमास कोणतीही मदत व दान करणार नाही त्याचप्रमाणे कायदेशीर बाजूनेही विचार करण्याचा इशारा यावेळी उपस्थित भक्त मंडळाने दिला आहे.

चौकट:-
अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांच्यावर एकाधिकार व घराणेशाहीचा आरोप ! रमेश गिरी महाराज यानाच्या विश्वस्त मंडळावर नियुक्तीसाठी आक्रमक झालेल्या भक्तांनी ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांच्यावर एकाधिकार व घराणेशाहीचा आरोप केला . त्यांचे म्हणे होते कि रमेशगिरी महाराज यांच्या विश्वस्त नियुक्तीबाबत अनेकदा विनंती करूनही चव्हाण घटनेचा आधार घेऊन हा विषय हेतुपुरस्पर टाळतात . मात्र ट्रस्टची अंतिम नसून त्यात विश्वस्त मंडळाच्या परवानगीने दुरुस्ती केली जाऊ शकते. मात्र आश्रमास रमेशगिरी यांच्या नावाने केवळ दान व मदत हवी असते , परंतु रमेशगिरी महाराज मात्र नको असतात. याच विश्वस्त मंडळाच्या विश्वस्तपदी चव्हाण यांनी वंशपरंपरेसारखे आपल्या चिरंजीवांची वर्णी लावली आहे त्याचप्रमाणे आपल्या दुसऱ्या चिरंजीवाचीही रिक्त जागेवर नियुक्ती करण्याचा त्यांचा प्रेत होता असा आरोप यावेळी भक्तांनी केला . विद्यमान अध्यक्षाचे वय पाहता त्यांना काम करणे शक्य होत नाही तरीही ते आपल्या पदाला चिकटून असल्याचा आरोपही भक्त मंडळी आता उघडपणे करू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *